अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुकी केल्याप्रकरणी इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाची मोठी कारवाई. एकूण ९ लाख ७० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

दोडामार्ग.
दोडामार्ग तिलारी रोडवरील कोनाळ ग्रामपंचायत जवळ अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करतांना चारचाकी वाहनासह अंदाजे ९,७०,९००/- रु. किंमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क,इन्सुली पथकाने जप्त केला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की दि. २० ऑक्टोंबर रोजी ०५.०० च्या सुमारास वाहन क्रमांक
केए-२२-सी-९३९८ सफेद रंगाची अशोक लेलंड कंपनीचे दोस्त टेम्पो चारचाकी वाहन तपासणी कामी पोलिसांनी थांबवली. प्रथमदर्शनी वाहन रिकामे असल्याचे दिसुन आले. परंतु वाहनाची अधिक तपासणी केली असता वाहनाच्या केबीनमध्ये चालकाच्या सीटच्या बाजुला गोवा बनावटीचा अवैध मद्यसाठा मिळून आला. तसेच चारचाकी वाहनाच्या रिकाम्या हौद्याची बारकाईने तपासणी केली असता हौद्यास चोर कप्पा असल्याचे दिसुन आले. चोर कप्पा उघडून पाहिल्यावर त्यामध्ये लपवून ठेवलेला गोवा बनावटीचा अवैध मद्यसाठा निदर्शनास आला.चोर कप्यातील मद्यसाठा मोजदाद केली असता त्यामध्ये गोवा बनावटीचे विदेशी मद्याच्या विविध ब्रॅन्डच्या एकुण १०७३ बाटल्यांचा साठा ( ३१२.२७ ब. लीटर) मिळून आल्या. सदर आरोपी लक्ष्मण सातेरी पाटील, वय ५१ वर्षे. रा. बहादरवाडी, किनये,बेळगाव यास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्यामध्ये अंदाजे रुपये रक्कम २,७०,९००/- किंमतीचे मद्य तसेच रु.७,००,०००/- किंमतीचे चारचाकी वाहन असा एकुण अंदाजे रु.९,७०,९००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर कारवाई सिंधुदुर्ग प्र.अधीक्षक वैभव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक संजय मोहिते, इन्सुली तपासणी नाका निरीक्षक तानाजी पाटील,दुय्यम निरीक्षक प्रदीप रास्कर, दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रसाद माळी,जवान रणजीत शिंदे यांनी केली.या प्रकरणी पुढील तपास प्रदीप रास्कर करीत आहेत.