नवरात्र सातवा दिवस : कालरात्री स्वरूप

नवरात्र सातवा दिवस : कालरात्री स्वरूप


 

   नवरात्रीचा सण देवी दुर्गेच्या राक्षसवरील विजयानिमित्त आणि तिच्या नऊ रूपांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो, जो वाईट गोष्टींवर चांगल्याचा विजय दर्शवतो. हा नऊ रात्रींचा सण ज्यामध्ये भक्त देवीच्या वेगवेगळ्या शक्तींचे आणि गुणांचे स्मरण करून तिची पूजा करतात. या उत्सवादरम्यान भक्तांना स्वयंशिस्त, भक्ती आणि दैवी ऊर्जा अनुभवण्याची संधी मिळते.
     नवरात्रीतील सातवा दिवस देवी कालरात्रीला समर्पित आहे, जी देवी दुर्गेचे उग्र पण भक्तांचे रक्षण करणारे स्वरूप आहे. तिचे स्वरूप अंधाऱ्या रात्रीसारखे काळे, विखुरलेल्या केसांचे आणि गळ्यात तेजाने चमकणाऱ्या माळेचे आहे. श्वासातून अग्नीच्या ज्वाळा निघतात आणि तिचे वाहन गाढव आहे.  चतुर्भुज असलेल्या देवीच्या एका हातात खड्ग, तर दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र आहे. तिसरा हात अभयमुद्रा आणि चौथा हात वरमुद्रा स्थितीत आहे. रिद्धी आणि सिद्धी प्रदान करणाऱ्या कालरात्री देवीचे नेत्र ब्रह्मांडाप्रमाणे विशाल आणि गोल आहेत. देवीची दृष्टी वीजेप्रमाणे चकाकणारी आहे. कालरात्री देवी सर्व वाईट शक्तींचा नाश करून भक्तांना धैर्य, शौर्य आणि अभय प्रदान करते. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. माता कालरात्रीला कालीका माता असेही म्हणतात. माता कालरात्रीचे रूप अतिशय भयंकर आहे कारण कालरात्री, माता दुर्गेचा सातवा अवतार मानली जाते.देवीचे हे कालरात्री रूप शुभ फळे प्रदान करते. म्हणूनच, तिला "शुभकारी" असेही म्हणतात. तिच्या या अवतारामागील मुख्य अख्यायिका अशी सांगितली जाते की, रक्तबीज  नावाचा एक उन्मत्त दैत्य सर्वत्र हाहाकार माजवू लागला. हा काही सामान्य राक्षस नव्हता. त्याने कठोर तपश्चर्या केली होती आणि भगवान ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचे वरदान मिळवले होते. ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिले होते की जेव्हा जेव्हा कोणी त्याला मारण्याचा प्रयत्न करेल तेव्हा त्याच्या शरीरातील रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडेल आणि त्यातून असंख्य रक्तबीज जन्माला येतील. त्याच क्षणी, देवीने कालरात्रीचे रूप धारण केले. राक्षस अत्यंत शक्तिशाली असला तरी, देवीला पराभूत करण्याची शक्ती त्याच्यात नव्हती. कालरात्रीने रक्तबीजला तिच्या खंजीराने मारले आणि त्याच्या शरीरातून वाहू लागलेले रक्त प्राशन केले. आणि अशाप्रकारे रक्तबीजाचा संहार केला. सप्तमीला कालरात्रीची पूजा करण्यामागे महत्वपूर्ण कारण म्हणजे असे म्हटले जाते की सहा दिवस देवीची पूजा केल्यानंतर, सातव्या दिवशी आपले मन सहस्र चक्रात स्थित केले जाते. अशा शुध्द भावाने कालरात्रीची पूजा केल्याने आपल्याला विश्वातील सर्व सिद्धी प्राप्त होतात आणि सर्व आसुरी शक्तींना दूर नेले जाते. या दिवशी परिधान केला जाणारा रंग म्हणजे नारंगी. नवरात्रीतील नारंगी (केशरी) रंग उत्साह, चैतन्य आणि ऊब दर्शवतो, जो देवी कालरात्रीच्या निर्भय आणि उग्र रूपाशी संबंधित आहे. हा रंग ऊर्जा आणि चैतन्याचे प्रतीक असून, भक्तांना जीवनातील अडथळे दूर करण्याची आणि सकारात्मकता आणण्याची प्रेरणा देतो. नारंगी रंग हा उत्साह आणि चैतन्याचे प्रतीक आहे, जो जीवनातील ऊर्जा आणि नवी सुरुवात दर्शवतो.