महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवून दाखवू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

पुणे.
राज्याच्या अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी असावी असा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे. यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्थाही वेगाने वाढणार असून महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवून दाखवू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मार्च २०२५ पर्यंतची तरतूद केली असून पुढेही दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल, असेही ते म्हणाले.फडणवीस पुढे म्हणाले, आजचा हा सावित्रींच्या लेकींचा कार्यक्रम आहे. पुणे ही समाजकारणाची आणि परिवर्तनाची भूमी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरूवात पुण्यापासून केली जात आहे. हे सरकार बहिणींना लाभ देणारे सरकार आहे. १ कोटी ३ लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे कार्यक्रमापूर्वीच जमा झाले आहेत. ऑगस्टमध्ये ज्या महिलांच्या अर्जाची छाननी होईल, त्यांना जुलैपासूनच लाभ मिळेल. सप्टेंबरमध्ये ज्या महिलांच्या अर्जांची छाननी होईल, त्यांनाही जुलैपासूनच लाभ मिळेल. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि सचिव अनुपकुमार यादव यांच्या नेतृत्वात अतिशय गतीने योजनेचा लाभ देण्याचे काम झाले आहे.