जयराम वायंगणकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड

वेंगुर्ले
भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाचे संचालक जयराम वायंगणकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे माजी अध्यक्ष रमण वायंगणकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.यावेळी भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाचे तालुका सरचिटणीस डॉ.आनंद बांदेकर, उपाध्यक्ष अंकिता बांदेकर, निवडणूक निर्णय अधिकारी श्री. साळगावकर, रमेश नार्वेकर, प्रकाश गडेकर, निलेश चमणकर श्रीकृष्ण पेडणेकर, नंदन वेंगुर्लेकर, दीपक पडवळ, पतसंस्थेच्या सचिव अनिता रेडकर आदी समाज बांधव उपस्थित होते. यावेळी रमण वायंगणकर म्हणाले की सिंधुदुर्ग ज़िल्हा भंडारी सहकारी पतसंस्था ही 1994 साली स्थापन झालेली असून स्थापने पासून बरीच वर्षे आपले वडील कै. शंकरराव वायंगणकर आणि इतर बऱ्याच मंडळींनी एकत्र येऊन समाजाच्या उद्धारासाठी ही पतसंस्था स्थापन केलेली होती. काही वर्षे आपले वडील या पतसंस्थेचे चेअरमन होते. बऱ्याच वर्षानंतर ही संधी जयरामला मिळालेली आहे. या संधीचे सोने करण्यासाठी आणि पतसंस्थेला उर्जितावस्था आणण्यासाठी सर्व संचालकानी एकत्रित पणे काम करावे तसेच एकमेकातील हेवेदावे बाजूला ठेवून पतसंस्थेला आपला वेळ देऊन वाढ विस्तार करावा व तालुक्यातील एक अग्रणी पतसंस्था म्हणून नावारूपाला आणावी. यावेळी तालुका सरचिटणीस डॉ. आनंद बांदेकर म्हणाले की, जयराम वायंगणकर यांची एकमताने पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड केल्याबद्दल सर्व संचालकांचे अभिनंदन केले. व अशाच पद्धतीची एकजूट दाखवून पतसंस्था नावारूपाला आणावी कारण ही संस्था सर्व समाज बांधवाची आहे, या संस्थेमध्ये सभासद वाढवा, जास्तीत जास्त ठेवी वाढवा यासाठी आपण एकत्रित पणे सर्व तालुक्यातील समाज बांधवापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. सर्वांनी एकत्रितरित्या जर पतसंस्थेच्या वाढीसाठी प्रयत्न केल्यास यश नक्की मिळेल असे आवाहन केले. यावेळी सर्व संचालक, पतसंस्था कर्मचारी व समाज बांधव उपस्थित होते.