ठाकरे सेनेच्या कामांसाठी नगराध्यक्षा आग्रही; नगराध्यक्षा नेमके कोणत्या पक्षात आहेत? देवगड न.पं.गटनेते शरद ठुकरुल यांनी उपस्थित केला सवाल.

ठाकरे सेनेच्या कामांसाठी नगराध्यक्षा आग्रही; नगराध्यक्षा नेमके कोणत्या पक्षात आहेत?   देवगड न.पं.गटनेते शरद ठुकरुल यांनी उपस्थित केला सवाल.

देवगड.

   देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या मासिक सभेमध्ये सिंधुरत्न समृद्ध योजनेतील निधीबाबत चर्चा करण्यात आली. सभेमध्ये भाजपच्या सर्व नगरसेवकांकडून सिंधुरत्न समृद्ध योजनेसाठीच्या सर्व प्रभागातील सर्वच कामांचे ठराव घेण्याबाबत नगराध्यक्षांना सुचविले. मात्र, नगराध्यक्ष साक्षी प्रभू या उबाठा नगरसेवक असलेल्या प्रभागातील फक्त दोनच कामांचे ठराव घेण्यासाठी आग्रही होत्या. प्रभू यांनी चार महिन्यांपूर्वीच उबाठा शिवसेना गट सोडून शिंदे शिवसेना गटामध्ये प्रवेश केला आहे.त्यामुळे नगराध्यक्षा नेमक्या कोणत्या पक्षात आहेत? ते त्यांनी स्पष्ट करावे, असा सवाल न. पं. गटनेते शरद ठुकरूल यांनी म्हटले आहे. न. पं. च्या मासिक सभेत सिंधुरत्न समृद्ध योजनेतील कामांच्या ठरावाबाबत नगराध्यक्षांना भाजप नगरसेवकांच्या कामांबाबत सूचना करूनही त्यांनी उबाठा शिवसेनेच्या नगरसेवकांच्या कामांबाबत आग्रही भूमिका घेतली. याबाबत त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबत साशंकता आहे. नगराध्यक्षांनी चार महिन्यांपूर्वी उबाठा शिवसेनेतून शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे. वास्तविक त्यांचे मुख्यमंत्री, राज्यस्तरीय सर्व खात्याचे मंत्री, सर्व आमदार या सर्वांची भूमिका ही भाजपसोबत एकत्र सत्तेत आहोत, अशी आहे. असे असताना नगराध्यक्षांना त्यांच्या पक्षाची भाजपशी असलेली युती माहिती नाही का? त्यांनी फक्त स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी निधी मिळण्यासाठी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे.सत्ताधाऱ्यांनी जनतेला अज्ञानी समजू नये नगरपंचायतीच्या मासिक सभेत सिंधुरत्न समृद्ध योजनेतून ३० ते ३५ कामे सुचविण्यात आली. त्यावेळी उबाठा गटाच्या दोनच कामांचे ठराव नगराध्यक्षा श्रीमती प्रभू कशा काय सभागृहामध्ये मांडतात. सत्ताधाऱ्यांनी देवगड- जामसंडे न. पं. हद्दीतील जनतेला अज्ञानी समजू नये. सर्व नागरिक सुज्ञान आहेत. आमदार नीतेश राणे यांच्या विकासाचे व्हिजन सर्वांनी पाहिले आहे. स्वतःच्या प्रभागातील विकासकामांच्या ठरावावरून वाद घालून जनतेची दिशाभूल करण्याव्यतिरिक्त नगराध्यक्ष व सत्ताधारी विकासाच्या मुद्दावर लक्ष देत नाहीत, असे ठुकरूल यांनी पुढे म्हटले आहे. नगरपंचायत हद्दीतील भेडसावणारा प्रादेशिक नळपाणी योजना प्रश्न, मोकाट जनावरांचा प्रश्न, कचरा प्रश्न, लाईटचा प्रश्न या जनतेच्या समस्यांकडे नगराध्यक्षा लक्ष देणार आहेत का? चुकीचा ठराव मंजूर केल्याची माहिती नगराध्यक्षांनी जनतेमध्ये पसरविणे चुकीचे आहे. आम्ही समाजकारण करतो, असेही ठुकरूल यांनी म्हटले आहे.