राष्ट्राच्या उभारणीसाठी हिंदी भाषेशिवाय पर्याय नाही : अमोल चव्हाण.
मालवण
समर्थ राष्ट्राचा पाया ही प्रत्येक देशाची भाषा ठरवते. जी भाषा सर्व राष्ट्रांमध्ये बोलले जाते ती संपर्क भाषा म्हणून उपयोगात आणली जाते. आज हिंदी भाषा व्यवहारात असून तिचा दैनंदिन वापर करून आपण एकामेकांशी संवाद साधत आहोत. राष्ट्राच्या उभारणीसाठी हिंदी भाषेशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडियाचे कट्टा शाखा व्यवस्थापक अमोल चव्हाण यांनी कट्टा येथील वराडकर हायस्कुल मध्ये बोलताना केले.
हिंदी दिनाच्या निमित्ताने कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (संयुक्त) मध्ये हिंदी काव्यगायन, कथाकथन, अनुवाद, भाषण, निबंध स्पर्धेत भाग घेतलेल्या इयत्ता ५ वी ते १२ वी च्या यशस्वी विद्यार्थ्यांना बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कट्टा व स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कट्टा यांच्याकडून पुस्तक रूपाने बक्षिसे वाटप करण्यात आली. त्यावेळी अमोल चव्हाण हे बोलत होते. या कार्यक्रम प्रसंगी वराडकर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक संजय नाईक, पर्यवेक्षिका सौ. देवयानी धनंजय गावडे, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनील नाईक, सचिव श्रीमती विजयश्री देसाई, स्कूल कमिटी अध्यक्ष सुधीर वराडकर, बँक ऑफ महाराष्ट्रचे श्री. पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, विश्वस्त कर्नल श्री वराडकर, उपाध्यक्ष, सर्व संचालक सल्लागार यांनी हिंदी दिनाच्या शुभेच्छा देऊन हिंदी विभागाच्या वतीने आयोजित उपक्रमास शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक हिंदी प्रमुख बाळकृष्ण मल्लाप्पा वाजंत्री यांनी केले. सूत्रसंचालन सौ. छाया प्रकाश कानूरकर यांनी केले. तर आभार रामकृष्ण अंकुश सावंत यांनी मानले. यावेळी हिंदी समितीच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती ज्योती नंदकिशोर मालवदे तसेच सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.