विकसित भारत संकल्प यात्रेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे काम उल्लेखनीय : सह सचिव संकेत भोंडवे.

विकसित भारत संकल्प यात्रेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे काम उल्लेखनीय : सह सचिव संकेत भोंडवे.

सिंधुदुर्ग.

    ग्रामीण, आदिवासी आणि शहरी भागातील नागरिकांना भारत सरकारच्या योजनांची माहिती व्हावी, त्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारने 'विकसित भारत संकल्प यात्रा' अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याने उल्लेखनीय काम केले आहे. जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सूक्ष्म नियोजनाव्दारे शासकीय योजना तळागाळात पोहचवतानाच योजनांची उल्लेखनीय प्रचार व प्रसिध्दी केली असल्याचे केंद्र शासनाचे सह सचिव तथा संकल्प यात्रेचे प्रभारी अधिकारी संकेत भोंडवे यांनी जिल्ह्याच्या कामाबाबत गौरव केला.
   भारत सरकार चे संयुक्त सचिव श्री.भोंडवे (भा.प्र.से) यांनी आज आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्य प्रशिक्षणार्थी आयएएस तथा देवगड तहसिलदार विशाल खत्री ,  निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत आदी विभाग प्रमुख उपस्थित होते.
   उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तनपुरे यांनी यावेळी संकल्प यात्रेच्या अंमलबजावणीची विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले या मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच पीएम उज्ज्वला योजना,  सुरक्षा बिमा, जीवनज्योती, आरोग्य तपासणी, आयुष्मान कार्ड वाटप, विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आले तसेच नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
   बैठकीनंतर सुकळवाड येथील विकसित भारत संकल्प यात्रेच्या विशेष कार्यक्रमाला श्री भोंडवे आणि इतर अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात श्री भोंडवे यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच लाभार्थ्यांना पीएम किसान कार्ड, बेबी केअर किट, आयुष्मान भारत कार्ड तसेच पोषण किटचे वाटप देखील त्यांच्या हस्ते करण्यात आले.