काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांचे सर्च ऑपरेशन जोरात.....दहशतवाद्यांचा छुपा अड्डा उद्ध्वस्त

जम्मू काश्मीर
जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली. सुरक्षा दलांनी एक दहशतवादी ठिकाण शोधून ते उद्ध्वस्त केले. या ठिकाणावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त केला, असे पोलिसांनी सांगितले. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन राबवले आहे. यादरम्यान ही कारवाई करण्यात आली. सुरक्षा दलांनी उत्तर काश्मीर जिल्ह्यातील मुश्ताकाबाद माछिल (समशा बेहक जंगल भाग) येथील सेदोरी नाला येथील जंगल भागात शोध मोहीम सुरू केली. या कारवाईदरम्यान दहशतवाद्यांचे एक ठिकाण शोधून ते उद्ध्वस्त केले. येथील घटनास्थळावरून ५ एके-४७ रायफल, ८ एके-४७ मॅगझिन्स, एक पिस्तूल, एक पिस्तूल मॅगझिन, एके-४७ चे ६६० राउंड्स, एक पिस्तूल राउंड आणि ५० राउंड एम४ दारूगोळा जप्त करण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.