विश्वविजेती टिम इंडिया मायदेशी दाखल; टीम इंडियाचं दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत.

विश्वविजेती टिम इंडिया मायदेशी दाखल; टीम इंडियाचं दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत.

नवी दिल्ली.

   दक्षिण आफ्रिकेला धुळ चारून टी-20 विश्वचषकावर नाव कोरत भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला. आज विश्वविजेती टीम इंडिया चमचमती ट्रॉफी घेऊन मायदेशी भारतात परतली आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर भारतीय संघाचे आज गुरूवारी सकाळी ६.२० वाजण्याच्या सुमारास आगमन झाले असून यावेळी क्रिकेटप्रेमींनी भारतीय संघाचे जल्लोषात स्वागत केले.
   विश्वचषक विजयानंतर भारतीय क्रिकेट संघ आज गुरूवारी सकाळी मायदेशी परतला आहे. काही वेळापुर्वी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर टीम इंडियाचे आगमन झाले आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ खराब हवामानामुळे बार्बाडोसमध्ये अडकला होता. मात्र आता रोहित सेना दिल्लीत पोहोचली आहे. दिल्लीत भारतीय संघ मुंबईला रवाना होण्यापूर्वी आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये मुक्काम करेल. त्यामुळे संघाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. टीम इंडियाचे शाही स्वागत करण्यासाठी क्रिकेट चाहते दिल्ली विमानतळावर पोहोचले होते.
   विमानतळावर सर्व चाहते भारतीय संघाची वाट पाहत होते. भारतीय संघाचे आगमन होताच चाहत्यांनी संघाचे जंगी स्वागत केले. दिल्लीमध्ये पोहोचल्यानंतर टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वा. मुंबईमध्ये नरीमन पाँईंट ते वानखेडे स्टेडियम अशी विजयी मिरवणूक निघणार आहे. ओपन बसमधून सर्व खेळाडूंसह भारतीय संघाची जंगी मिरवणूक होणार आहे.