सिंधुदुर्गात अवकाळीच्या हलक्या सरी.....आंबा, काजू बागायतदारांची चिंता वाढली
सावंतवाडी
जिल्हयातील काही भागात सोमवारी सकाळपासून अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील काजू आणि आंबा बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे. आधीच बदलत्या हवामानामुळे काजू व आंबा पिकांचा मोहोर करपण्याची समस्या निर्माण झाली होती. त्यातच झालेल्या पावसामुळे उरलेसुरले उत्पादनही धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुक्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार होत आहेत. दिवसा उकाडा आणि रात्री गारवा, तसेच अधुनमधून ढगाळ वातावरण यामुळे पिकांच्या वाढीवर विपरित परिणाम होत आहे. काजूच्या झाडांना सध्या मोहोर आणि फलधारणा अवस्था असताना पावसाच्या सरी कोसळल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. ओलसर वातावरणामुळे मोहोर गळणे, करपणे आणि फळधारणेत घट होण्याची भीती बागायतदार व्यक्त करत आहेत.आंबा पिकाबाबतही अशीच परिस्थिती आहे. अनेक बागांमध्ये मोहोर येऊन गेला असला, तरी काही ठिकाणी तो करपल्याचे दिसून आले आहे. अशावेळी पडलेल्या पावसामुळे उरलेला मोहोरही खराब होण्याची शक्यता आहे. विशेषतः फवारणी केलेल्या बागांमध्ये पावसामुळे औषधांचा परिणाम कमी होऊ शकतो, असे शेतकरी सांगतात. त्यामुळे पुन्हा फवारणी करावी लागण्याची शक्यता असून त्याचा अतिरिक्त खर्चही सहन करावा लागणार आहे.बागायतदारांचे अर्थकारण मोठ्या प्रमाणात काजू आणि आंबा आहे. मागील काही वर्षांपासून हवामानातील अनियमित बदलांमुळे पिकांवर अवलंबून उत्पादनात चढ-उतार होत आहेत.

konkansamwad 
