सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस यांच्या वतीने सावंतवाडी शहरात दंगा काबु योजना

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस यांच्या वतीने सावंतवाडी शहरात दंगा काबु योजना

 

सावंतवाडी


         गुढीपाडवा व रमजान ईद सणांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची परिस्थीती निर्माण झाल्यास सदर परिस्थीती योग्य प्रकारे हाताळून नागरीकांचे जिवीत व मालमत्तेचे रक्षण करता यावे, शांतता अबाधित रहावी याकरीता सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सावंतवाडी शहरात दंगा काबु योजना राबविण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे व सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले, पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्रीम. माधुरी मुळीक, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, बांदा पोलीस स्टेशनचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुनिल पडवळ, कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. वाघाटे असे १२ अधिकारी व १०३ पोलीस अंमलदार यांनी या संचलनात सहभाग घेतला.सावंतवाडी शहरात पोलीसांच्यावतीने जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, लेक व्ह्यू तीठा, नगरपरीषद, जयप्रकाश चौक, गांधी चौक असे पथ संचलन करण्यात आले. यावेळी संचलनाकरीता एक मोठे वाहन व ६ लाईट व्हॅनचा वापर करण्यात आला. भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होवु नये याकरीता नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये, तसेच कोणत्याही धर्म, जात, वंश, जन्माचे ठिकाण वगैरे कारणावरुन दोन गटात तेढ निर्माण होतील अशी वक्तव्ये कोणी करु नयेत तसेच सोशल मिडीयावर प्रसारीत करु नयेत, नागरीकांच्या मनात भिती निर्माण होईल अशी रिल्स बनवू नयेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे सायबर पोलीस ठाण्यामार्फत सोशल मिडीयावर प्रसारीत होणाऱ्या सर्व पोस्टवर बारकाईने सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. जो कोणी सोशल मिडीयाच्या आधारे दोन गटात, धर्मात वाद होणारी पोस्ट प्रसारीत करेल, अशा इसमांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.