रत्नागिरी विमानतळावर ‘नाईट लँडिंग’ची चाचणी. ‘उडान’ योजनेअंतर्गत रत्नागिरीकरांचे विमान प्रवासाचे स्वप्न लवकरच साकारणार.
रत्नागिरी.
भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यातील येथील विमानतळावर रविवारी सायंकाळी ‘नाईट लँडिंग’ची चाचणी घेण्यात आली. रत्नागिरी विमानतळावर आतापर्यंत फक्त दिवसा विमान उतरू शकेल, अशी सुविधा होती. मात्र, आता नाईट लँडिंगची चाचणी झाल्याने रत्नागिरीवासियांचे विमान प्रवासाचे स्वप्न लवकरच साकारणार आहे.
भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यात असलेल्या या विमानतळावरून आतापर्यंत केवळ तटरक्षक दलाची हेलिकॉप्टर्स तसेच व्हीआयपींसाठीची छोटी विमाने तीही दिवसा उतरतील, अशी सुविधा होती. मात्र आता नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे रत्नागिरीकरांचे विमानातून प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकणार आहे.
रविवारी सायंकाळी उशिराने पहिल्यांदाच तटरक्षक दलाच्या विमानाचे ‘नाईट लँडिंग’ झाले. रात्रीच्या वेळी लँडिंग आणि टेकऑफ अशा दोन्ही प्रकारच्या चाचण्यांमुळे रात्री नऊ वाजेपर्यंत रत्नागिरीच्या आकाशात चाचणीसाठीचे विमान घिरट्या घालताना दिसत होते.
केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत रत्नागिरीतून लवकरच विमान झेपावणार आहे. येथील धावपट्टीचे उर्वरित काम पूर्ण झाल्यामुळे नाईट लँडिंग च्या सुविधांची कामे पूर्ण केल्याने रविवारी सायंकाळी तटरक्षक दलाच्या विमानाने पहिले यशस्वी नाईट लँडिंग केले, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.