जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात; पहिल्या टप्प्यात १०२ मतदारसंघात मतदान. महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात; पहिल्या टप्प्यात १०२ मतदारसंघात मतदान.  महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश.

दिल्ली.

   जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी ओळख असलेल्या आणि साऱ्या जगाचे लक्ष ज्या निवडणुकीकडे आहे अशा भारतामधील २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला शुक्रवार, १९ एप्रिल रोजी सुरुवात झाली आहे. देशभरातील २१ राज्यांमधील १०२ मतदारसंघात साधारण १६ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. राज्यातील नागपूर, भंडारा-गोंदिया, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.
    राज्यातील पाचही मतदारसंघातील मतदारांनी सकाळीच मतदान केंद्रावर रांगा लावत पहिल्या टप्प्याची मोठ्या उत्साहात तयारी केली आहे. देशभरात मोठ्या संख्येने मतदार आपला हल्ला बजावताना दिसत असून सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये जिथे राज्यातील सर्व जागांवर मतदान होत आहे. त्यामध्ये तामिळनाडू (३९ जागा), उत्तराखंड (५ जागा), अरुणाचल प्रदेश (२ जागा), मेघालय (२ जागा), अंदमान आणि निकोबार (१ जागा), मिझोराम (१ जागा), नागालँड (१ जागा), पुदुचेरी (१ जागा), सिक्किम (१ जागा), आणि लक्षद्वीप (१ जागा) यांचा समावेश आहे.
   तर, राजस्थान (१२ जागा), उत्तर प्रदेश (८ जागा), मध्य प्रदेश (६ जागा), आसाम (५ जागा), महाराष्ट्र (५ जागा), बिहार (४ जागा), पश्चिम बंगाल (३ जागा), मणिपूर (२ जागा), त्रिपुरा, जम्मू-काश्मीर आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी एका जागेवर आज मतदान होत आहे. त्याबरोबरच अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील विधानसभा निवडणुकीचं मतदानही आज होत आहे. महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यामधील पाच जागांच्या लढतींकडे लक्ष असणारा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्य सरकारमधील मंत्री सुधीर मुनगंटीवार या नेत्यांचे भवितव्य मतदान पेटीत कैद होणार आहे.