फासकीत अडकलेल्या बिबट्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले जेरबंद
मालवण
मालवण वनविभागाच्या परिमंडळात धामापूर नियतक्षेत्रातील राठीवडे (भाकरदेव) नजीकच्या मालकी जंगल भागात बिबट्याला फासकीत अडकलेल्या अवस्थेतून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात वनविभाग आणि ग्रामस्थांना यश आले आहे. राठीवडे येथील स्थानिक ग्रामस्थ सुभाष तळवडेकर यांनी हा बिबट फासकीत अडकल्याची माहिती तातडीने वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, जलद बचाव पथक आणि ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून वनविभागाचे अधिकारी, जलद बचाव पथक आणि ग्रामस्थ यांनी अत्यंत सुरक्षित आणि नियोजित पद्धतीने या बिबट्याची फासकीतून सुटका केली. त्यानंतर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बिबट्याची तपासणी करण्यात आली असता, तो पूर्णपणे सुस्थितीत असल्याचे आढळल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
सदरचे बचावकार्य सावंतवाडी उपवनसंरक्षक मिलीश दत्त शर्मा आणि सावंतवाडी सहा. वनसंरक्षक डॉ. सुनील लाड, यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले. या बचाव पथकात कुडाळ वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, मालवण वनपाल सदानंद परब, नेरूर वनपाल सुर्यकांत सावंत, धामापूर वनरक्षक अतुल खोत, कांदळगाव वनरक्षक लक्ष्मण आमले, नेरूर वनरक्षक सचिन पाटील, वाहन चालक राहुल मयेकर, RRT टीम सदस्य अनिल गावडे, दिवाकर बांबर्डेकर, सुशांत करंगुटकर, वैभव अमरुस्कर, प्रसाद गावडे याशिवाय राठीवडे पंचक्रोशीतील ग्रामस्थांचाही सहभाग होता.

konkansamwad 
