७२ व्या अखिल भारतीय सहकारी सप्ताहाचा उद्घाटन समारंभ संपन्न
सिंधुदुर्गनगरी
दरवर्षी देशभरात दिनांक १४ ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सहकार सप्ताह साजरा केला जातो. सहकारातील सर्वात मोठा उत्सव म्हणून याकडे पाहिले जाते. या सप्ताहाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ मर्या. सिंधुदुर्ग यांचे संयुक्त विद्यमाने हा सप्ताह पूर्ण जिल्हाभरात साजरा केला जाणार आहे. या सप्ताहाचा उद्घाटन सोहळा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला.
या सप्ताह सोहळ्याची सुरुवात जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा. मनीष दळवी यांच्या हस्ते सहकार ध्वजाचे ध्वजारोहण करुन करण्यात आले. या सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष श्री. आर. टी. मर्गज यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून व भारताचे पहीले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाचे विकास अधिकारी श्री. पांचाळ यांनी सहकार गीत सादर केले.
या कार्यक्रमाचा प्रमुख विषय कार्यक्षमता, जबाबदारी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देणे हा होता. यावेळी प्रास्ताविकात सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाचे अध्यक्ष श्री. गजाजन सावंत यांनी सहकाराची मुलतत्वे सांगुन जिल्ह्यातील सहकाराला यापुढे निश्चित चांगले दिवस येतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी उपस्थित वक्ते श्री. ऐनापुरे यांनी सहकार सप्ताहाचे मूळ उद्देश व महत्त्व सांगताना सहकारांतर्गत सहकार जोपासण्यावर भर दिला. सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ व त्यांच्या अडचणींवर भाष्य करीत जिल्हा निबंधक व जिल्हा बँक यांच्या मदतीने मंडळाच्या माध्यमातून सहकार चळवळ जिल्ह्यात अधिक मजबूत केली जाईल असे सांगितले. तर श्री. एम. के. गावडे यांनी सहकाराच्या देशभरातील इतिहासाला उजाळा देत कॉम्प्युटरायझेशन व त्यामुळे संस्थांच्या व्यवहारात आलेली पारदर्शकता यांचे महत्व विषद केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटनपर भाषणात श्री. आर. टी. मर्गज यांनी जिल्ह्यात रुजलेला सहकार आणि त्यामध्ये जिल्हा बँकेने बजावलेली महत्त्वाची भूमिका यावर भाष्य केले व जिल्हा बँकेचे नाव केवळ राज्यातच नव्हे तर देशातही पोहोचले आहे असे सांगुन जिल्हा बँकेने आधुनिकतेची कास धरत ही प्रगती साधली असल्याचे नमूद केले व बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात अध्यक्ष श्री. दळवी यांनी महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक जडणघडणीत सहकाराचा फार मोठा वाटा असल्याचे सांगुन सहकार चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी सहकारातील सर्वच व्यवहारांमध्ये पारदर्शकता टिकवणे व सर्व व्यवहार शिस्तबद्ध करण्यासाठी डिजिटलायझेशनला पर्याय नसल्याचे नमूद केले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा आग्रहाने वापर करीत बँकेच्या एकूण व्यवहारापैकी ८० टक्के व्यवहार हे डिजिटल माध्यमातून होत असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा सहकार मंडळाच्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी जिल्ह्यातील सहकार चळवळीतील सर्वच मंडळी नक्कीच पुढे येतील व जिल्हा बँक म्हणून आम्ही कायमच सोबत असू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या काळात सहकार चळवळीला नक्कीच चांगले दिवस येतील व त्यासाठी लागणारी क्षमता आपल्या सर्वांमध्ये आहे असा विश्वास व्यक्त करीत जिल्ह्यात साजरा होत असलेल्या या सप्ताहास सर्व संस्था पदाधिकारी तसेच जास्तीत जास्त सहकारात काम करणाऱ्या सर्वांनी सहभाग घेऊन हा सप्ताह यशस्वी करू व सहकार चळवळ अधिक मजबूत करू असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला जिल्हा निबंधक श्री. बाळ परब, विद्याप्रसाद बांदेकर, समीर सावंत, विठ्ठल देसाई, संचालिका श्रीम. प्रज्ञा ढवण, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, विनोद मर्गज, विक्रम मुंबरकर तसेच जिल्हा बँकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच संस्था पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

konkansamwad 
