येत्या ४८ तासात मान्सून भारतात दाखल होणार; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस.

येत्या ४८ तासात मान्सून भारतात दाखल होणार; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस.

मुंबई.

   मौसमी पावसाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच मान्सून भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासांत मान्सून अंदमान-निकोबार तसेच बंगालच्या उपसागरातील वायव्य बेटांवर दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
   राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा मुक्काम आणखीच वाढणार असून येत्या शुक्रवारपर्यंत (२४ मे) अनेक भागात तुफान पाऊस कोसळणार असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भात सर्वांत अधिक अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागात गारपीट, तर कोकणात गरमी आणि आर्द्रता वाढणार आहे. यापार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्टही जारी करण्यात आलाय. शेतकऱ्यांनी फळबागांची काळजी घ्यावी, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
   हवामान खात्याने नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्याला येत्या २४ मेपर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय जळगाव, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली जिल्ह्याला पुढील दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
   हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस मोसमी वाऱ्यांना अनुकूल स्थिती असल्यामुळे येत्या ४८ तासांत मान्सून दक्षिण अंदमान समुद्रासह निकोबार बेटे, तसेच बंगालच्या उपसागरातील वायव्य बेटांवर दाखल होईल. वायव्य बंगालच्या उपसागरात २२ मे रोजी कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. २४ मे रोजी या दाबाचे रुपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होऊ शकते. या स्थितीची तीव्रता कायम राहिल्यास केरळमध्ये वेळेपूर्वीच मान्सून दाखल होईल, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.