परुळे विद्यामंदिरमध्ये कवी अरुण म्हात्रे यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

वेंगुर्ला
वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे प्रशालेमध्ये मराठी भाषेचे आघाडीचे कवी अरुण म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या प्रशालेच्या 'संवाद' या चर्चासत्राचे पुढील पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित असलेले कविवर्य अरुण म्हात्रे यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांशी कविता, गाणी व विनोदी चुटकुले यांच्या स्वरुपात संवाद साधला. विदयार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. या प्रसंगी कवी अरुण म्हात्रे यांनी स्वरचित अनेक कवितांचे ताला- सुरात गायन केले. त्यासोबतच मराठी भाषेचे कवी मंगेश पाडगांवकर, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, बालकवी, साने गुरुजी अशा अनेक सुप्रसिद्ध कवींच्या कविता आपल्या उत्कृष्ट शैली मध्ये सादर केल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या तालबद्ध टाळ्यांच्या ठेक्यांनी त्यांना उत्तम साथ दिली. आपली कविता लेखन कला विकसीत करण्यासाठी भरपूर वाचन करण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.आपले आई-वडील, मराठी भाषा, मराठी भाषेचे कवी आणि आपल्या देशावर आपली निष्ठा व प्रेम असले पाहिजे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी स्वलिखित व संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या 'उंच माझा झोका' या मालिकेचे शीर्षक गीत सादर केले.या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. उमाकांत सामंत, संस्था सीईओ अमेय देसाई, मुख्याध्यापक सचिन माने, प्रशालेचे शिक्षक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभू पंचलिंग यांनी केले.