तलाठी भरती परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा केंद्र द्या; अन्यथा आंदोलन! आमदार वैभव नाईक यांचा इशारा.
सिंधुदुर्ग.
होऊ घातलेल्या तलाठी भरती परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा केंद्र नसल्याचे निदर्शनास आले असून त्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व महाराष्ट्र राज्य भूमिअभिलेखचे अपर जमाबंदी आयुक्त तथा अतिरिक्त संचालक यांच्याशी चर्चा करून तलाठी भरती परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा केंद्र देण्याची मागणी केली आहे. मात्र मागणी मान्य न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.
तलाठी पदभरती परीक्षा दिनांक १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. मात्र परीक्षेच्या जाहिर झालेल्या परीक्षा केंद्रांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा केंद्र नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तलाठी परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची गैरसोय होणार आहे.त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व महाराष्ट्र राज्य भूमिअभिलेखचे अपर जमाबंदी आयुक्त तथा अतिरिक्त संचालक यांच्याशी चर्चा करून तलाठी भरती परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा केंद्र देण्यात यावे अशी मागणी केली आहे. खासदार विनायक राऊत यांनी देखील दोन्ही अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली आहे.त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी देखील महाराष्ट्र राज्य भूमिअभिलेखच्या अपर जमाबंदी आयुक्तांशी पत्रव्यवहार करून तशी मागणी केली आहे. तरी देखील तलाठी भरती परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा केंद्र देण्यात आले नाही तर त्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.