वेंगुर्ला येथे नगरपरिषद मार्फत महिला दिनानिमित्त स्‍नेह मेळावा संपन्‍न.

वेंगुर्ला येथे नगरपरिषद मार्फत महिला दिनानिमित्त स्‍नेह मेळावा संपन्‍न.

वेंगुर्ला.

   दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका अभियान, माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत महिला दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत "बचत गट स्नेहमेळावा" उत्साहात संपन्न झाला.  या महिला मेळाव्‍यात बोलताना मा.मुख्‍याधिकारी परितोष कंकाळ म्‍हणाले बचतगटांना बाजारपेठ तसेच व्यासपीठ मिळवून देताना त्यांच्या कलागुणांना वाव देणारं हक्काचं व्यासपीठ म्हणजे वेंगुर्ला नगरपरिषद.सिंधुरत्न  समृध्‍द योजने अंतर्गत दहा महिला बचत गटांची व्यवसायासाठी अनुदानित कर्ज प्रस्ताव मंजूर झाले आहेत.अधिकाधिक बचत गटांनी व्यवसाय करण्यासाठी पुढे यावे यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य वेंगुर्ला नगरपरिषदेच्या माध्यमांतून होत राहील, असे प्रतिपादन वेंगुर्ला नगरपरिषद मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी महिला बचत गटाच्या सांस्कृतिक स्नेहमेळाव्यात अध्यक्ष पदावरून व्यक्त केले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमा बरोबर स्वच्छ व पर्यावरण जागृतीबाबतचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पर्यावरण दुत व खर्डेकर महाविद्यालयाच्या हेड ऑफ  बॉटनी डिपार्टमेंट डॉ. धनश्री पाटील, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, साप्ताहिक किरात संपादक सीमा मराठे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी विलास ठुंबरे, हिरकणी शहर स्तर संघ अध्यक्ष मेघा पडते उपस्थित होते.
   गेल्या दहा वर्षात बचत गटाचे वेंगुर्ल्यातील कामकाज हे विशेष उल्लेखनीय असेच आहे. जवळपास 110 महिला बचत गट सध्या कार्यरत असून बचत गटाच्या माध्यमातून स्वयं सहाय्यते सोबत शहरातील आर्थिक उलाढाल वाढविण्यासाठीही त्यांचा हातभार लागत आहे, या बद्दल विशेष कौतुक किरात चे संपादक सौ. सिमा मराठे यांनी केले.
    या बचत गटांना प्रोत्साहन म्हणून उत्कृष्ट CRP - सुशीला रेडकर,  उत्कृष्ट बचत गट - आशा महिला बचत गट, उत्कृष्ट वस्ती स्तर संघ ओम  - शामल केनवडेकर, उत्कृष्ट वस्ती स्तर संघ अध्यक्ष - वैभवी पालव,  उत्कृष्ट बचत गट अध्यक्ष - स्मिता कोणेकर, उद्योजक - स्वाती बेस्ता, बचतगटातील अष्‍टपैलू व्‍यक्‍तीमत्‍व म्‍हणुन शिवानी तामणेकर, जॉयसी फर्नांडीस, निर्मल कुडपकर, सुहानी जाधव, आस्‍मीना मकानदार यांना गौरवण्‍यात आले. त्‍याचप्रमाणे दोन प्रातिनिधिक महिला सफाई कर्मचारी - मेघना घाटकर, सेजल जाधव यांचाही गाैरव करण्‍यात आला तसेच पर्यावरण दुत म्हणून डॉ.धनश्री पाटील तर स्वच्छता दुत म्हणून सीमा मराठे यांना मान्यवरांच्या हस्ते बांबूपासून बनविलेले पर्यावरण पुरक कंदिल देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बचत गटामार्फत वेंगुर्ला नगरपरिषदेने केलेल्या सर्वांगीण सहकार्य बद्दल मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांना सन्मानित करण्यात आले.
   महिला स्वच्छते मध्ये महत्वाची भूमिका बजावतात त्यांच्या मध्ये स्वच्‍छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी महिला दिनानिमित्त वेंगुर्ला नगरपरिषदेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. 
1) अक्षय ऊर्जा स्त्रोतांचा वापर - अक्षय ऊर्जेचा वापर म्हणजेच पर्यावरणाचे संरक्षण, आर्थिक वाढ आणि सामाजिक आरोग्याला योगदान देणारे आहे. याचे महत्त्व महिलांपर्यंत पोचविण्यासाठी व नुकतीच जाहीर झालेली "प्रधानमंत्री सुर्योदय योजना" याची माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता इ. या विषयी श्री. भूषण राणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच महिलांशी प्रत्‍यक्ष संवाद साधून त्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यात आले.
२) कोकेडामा प्रशिक्षण - सध्या कोकेडामा हे घर किंवा कार्यालयासाठी आकर्षक व सौंदर्यदृष्ट्या आनंददायी भेट आहे. याची वाढती मागणी बघता ही एक व्‍यवसायाची संधी ठरत आहे. हे लक्षात घेत कोकेडामा तयार करण्याचे व त्यापासून व्यवसाय कसा निर्माण करावा याबाबतचे प्रशिक्षण डॉ. धनश्री पाटील यांनी महिलांना केले.
३) घरगुती खत निर्मिती - घरात निर्माण होणारा ओल्‍या कचऱ्यापासून घरीच खत निर्मिती, ओल्या कचऱ्याचे  व्यवस्थापन घरगुती स्तरावर करून त्यापासून आपल्या जमिनीची जैविक गुणवत्ता कशी वाढवावी यासंबंधीचे प्रात्यक्षिक प्रा. प्रितिश लाड यांनी दिले.
४) स्वच्छतेचे खेळ - महिलांना कचरा वर्गीकरण व प्लॅस्टिक बंदी या बद्दलची जागृती सोप्या पद्धतीने खळांच्या माध्यमातून करण्यात आली. नगरपरिषदे मार्फत विविध मनोरंजक स्‍वच्‍छतेचे खेळ घेण्यात आले.
५) वसुंधरा शप्पथ - महिला दिनाचे औचित्य साधुन सर्व महिलांनी या वसुंधरेचे रक्षण व संवर्धन करण्याची शप्पथ घेतली.   
६) सिंधुरत्‍न समृध्‍द योजनेअंतर्गत ज्‍या बचतगटांचे ७५ टक्‍के अनुदानीत कर्जप्रस्‍ताव मंजूर झाले त्‍यामध्‍ये खाद्यपदार्थ, काजूप्रक्रीया युनिट, मसाला व्‍यवसाय, नारळापासून विविध खाद्यपदार्थ बनविणे, सुकेमासे इत्‍यादी व्‍यावसायिक बचतगटांना पुढे व्‍यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन करण्‍यात आले. DAY-NULM अंतर्गत यावर्षी मंजूर झालेल्‍या वैयक्‍तीक कर्जप्रस्‍ताव, बचतगटांचे कर्जप्रस्‍ताव, PM SVANidhi  मधील कर्जप्रस्‍ताव यांचा आढावा घेऊन त्‍याविषयी सविस्‍तर मार्गदर्शन करण्‍यात आले. व शेवटी बचतगटातील महिलांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.       
    यावेळी शहरातील बचत गटांतील महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.  त्‍याचे सूत्रसंचालन मयुरी परब आणि ऐश्वर्या सावंत यांनी केले. तर प्रास्ताविक व आभार सौ. संगीता कुबल यांनी मानले.