सहकारामुळे ग्रामीण विकासाला मोठी चालना - मनीष दळवी

सहकारामुळे ग्रामीण विकासाला मोठी चालना - मनीष दळवी

 

मठ

 

      सहकारी संस्था हे ग्रामीण भागाचे आधारस्तंभ असून सहकारामुळे रोजगारनिर्मिती, उद्योगविकास आणि सामाजिक प्रगतीला मोठी चालना मिळते," प्रत्येकाने प्रामाणिकपणे पारदर्शकपणे काम करून आपली संस्था नावारूपाला कशी येईल त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या संस्थांना जिल्हा बँकेचे सर्वतोपरी सहकार्य लाभेल असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले. मठ येथे ७२ व्या अखिल भारतीय सहकारी सप्ताहाच्या कार्यक्रमा निमित्त सहकार मेळावा आयोजित केला होता. यावेळी मार्गदर्शन करताना श्री दळवी बोलत होते.
      श्री. स्वयंमेश्वर वि.का.स सेवा संस्था लि. मठ येथे हा मेळावा उत्साहात पार पडला. श्री. दळवी यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहकार अधिकारी आर टी चौगुले, जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष गजानन सावंत, संचालक एम के गावडे, वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर केळजी, भोगवे गावचे माजी सरपंच महेश सामंत, जिल्हा सहकार बोर्डाचे माजी संचालक रमण वायंगणकर आदी उपस्थित होते.
       देशभर चालू असलेल्या सहकारी सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार श्री. स्वयंमेश्वर वि.का.स सेवा संस्थेने सहकार सप्ताहानिमित्त विशेष मेळाव्याचे आयोजन केले गेले होते. यावेळी बोलताना श्री. दळवी यांनी आपल्या भाषणात सहकार चळवळीचे महत्त्व अधोरेखित करताना ग्रामीण उद्योजकांना आधुनिक तंत्रज्ञान, विपणन, प्रशिक्षण आणि सहकारी संस्थांचा आधार घेत दर्जेदार उत्पादने तयार करून बाजारपेठेत उतरावे असे आवाहन केले. सहकाराच्या माध्यमातून युवकांना स्वावलंबनाच्या संधी वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
      या कार्यक्रमात सहकार अधिकारी आर. टी. चौगुले यांनी सहकाराच्या माध्यमातून पर्यटन, लघुउद्योग आणि प्रक्रिया व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवीन दिशा देऊ शकतात असे सांगितले. तर एम. के. गावडे यांनी गावोगाव सहकार जागृतीची गरज अधोरेखित केली. मेळाव्याचे प्रास्ताविक सहकार बोर्डाचे विकास अधिकारी मंगेश पांचाळ यांनी केले. मठ संस्थेचे अध्यक्ष सुभाष बोवलेकर यांनी संस्था सभागृहात कार्यक्रम पार पडण्यास सहकार्य केले. या मेळाव्याला वेंगुर्ला तालुक्यातील सर्व विकास संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.