आडेली गावात उद्या प्रसिद्ध 'घोडेमोडणी' उत्सव
वेंगुर्ला
वेंगुर्ला शहरासह संपूर्ण तालुक्यात होळी पौर्णिमेनंतर शिमगोत्सवाने मोठी रंगत आणली आहे. तालुक्यातील गावागावात हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असून गुरुवारी उत्सवाच्या चौथ्या दिवशी ग्रामदैवतांच्या निशाणांचे घरोघरी वाजत-गाजत आगमन झाले. आज रात्री आणि उद्यापर्यंत हे निशाण घरोघरी फिरणार असून, या मंगलमय वातावरणात सहभागी होण्यासाठी स्थानिक तरुणांसह मुंबईकर चाकरमानीही मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. गावागावातील परंपरेनुसार आज 'रोम्बाट' काढण्यात आले, ज्यामुळे ग्रामीण भागात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. या उत्सवाचा मुख्य आकर्षण असलेला आडेली गावातील प्रसिद्ध 'घोडेमोडणी' हा धार्मिक कार्यक्रम उद्या संपन्न होणार आहे. यावेळी श्री देव चव्हाटा मंदिर येथे मांडावर देवतेस नारळ ठेवून विशेष 'खेळे' हा पारंपारिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. तालुक्यात पाचव्या दिवशी होणाऱ्या या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे ग्रामीण भागात भक्ती आणि उत्साहाचे अनोखे संगम पाहायला मिळत आहे.

konkansamwad 
