सावंतवाडी येथील राजवाड्यात १६ डिसेंबरला स्वामी समर्थांच्या कृपा पादुकांचे आगमन

सावंतवाडी येथील राजवाड्यात १६ डिसेंबरला स्वामी समर्थांच्या कृपा पादुकांचे आगमन

 

सावंतवाडी

 

    श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट राजघराण्यातील श्रीमंत मालोजीराजे भोसले यांना प्रदान केलेल्या पवित्र पादुकांचे मंगळवार, १६ डिसेंबरला सावंतवाडी संस्थानच्या राजवाडा दरबार हॉल येथे आगमन होणार आहे. सध्याचे नरेश श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले तिसरे यांच्या पुढाकाराने हा दिव्य दर्शन दौरा आयोजित करण्यात आला आहे. श्रीमंत मालोजीराजे भोसले यांना स्वामी समर्थ महाराजांनी प्रत्यक्ष कृपावंत होऊन या पवित्र पादुका प्रदान केल्या होत्या.
       ६ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या पादुकांच्या दिव्य प्रवासात सातारा, फलटण, मिरज, सांगली, मुधोल, होंडा, पणजी, सावंतवाडी, कागल, कोल्हापूर, भोर, पिंपरी-चिंचवड, पुणे, मुंबई, ठाणे आणि डोंबिवली या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. सावंतवाडी संस्थानच्या राजवाड्यात मंगळवार, १६ डिसेंबरला सकाळी १०.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांना या पादुकांचे दर्शन घेता येणार आहे. राजवाड्यात पादुकांचे आगमन झाल्यावर त्यांची विधिवत पूजा केली जाईल आणि त्यानंतर भाविकांना दर्शन व कृपाआशीर्वादाचा लाभ घेता येईल. सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत खेम सावंत भोसले आणि श्रीमंत शुभदादेवी भोसले यांनी स्वामींच्या या कृपा पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी सर्व भक्तांना आवाहन केले आहे.