आराध्य सिनेमामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळेल : सामाजिक कार्यकर्त्या रेणूताई गावस्कर. झाराप येथे आराध्य सिनेमा थिएटरचा शुभारंभ.

आराध्य सिनेमामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळेल : सामाजिक कार्यकर्त्या रेणूताई गावस्कर.  झाराप येथे आराध्य सिनेमा थिएटरचा शुभारंभ.

कुडाळ.

    सिनेमा हे प्रभावी माध्यम आहे या सिनेमातून उत्कृष्ट कलावृत्ती, शैक्षणिक प्रगती आणि वातावरण निर्मिती होते. या थिएटरमुळे जिल्ह्यातील पर्यटनाला नक्कीच चालना मिळेल, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणूताई गावस्कर यांनी केले. झाराप झिरो पॉईंट नेमळे येथे आज उद्योजक उदय पारळे व सौ. स्मिता पारळे यांच्या आराध्य सिनेमा या थिएटरचा शुभारंभ झाला, त्यावेळी उद्घाटक म्हणून रेणूताई गावस्कर बोलत होत्या.
   यावेळी व्यासपीठावर उद्योजक शैलेश पै, आकेरी गावचे सरपंच महेश जामदार, आर्किटेक साहस पाटील, कर सल्लागार अशोक सारंग, जयेंद्र तेली, बांधकाम उद्योजक शरद सावंत, राजेंद्र पाटील, श्रीराम धुरी, अॅड नकुल पार्सेकर, डॉक्टर हर्षदा देवधर उपस्थित होते.
    आपल्या भाषणात रेणूताई गावस्कर पुढे म्हणाल्या, मी समाज कार्य करण्यासाठी जिल्ह्यात वेताळ बांबार्डे येथे आले, तेव्हा याठिकाणी सिनेमागृह नाही याची खंत मला होती.मी सिनेमाची वेडी आहे, पुणे येथे अनेक संध्याकाळ मी थिएटरमध्ये घालविल्या आणि त्यातूनच मला माणुसकी व समाजकार्य याची आवड लागली. उदय पारळे यांनी आज थिएटरचा प्रारंभ करून माझे स्वप्न सत्यात आणले. पारळे यांना मी जवळून ओळखते. त्यांनी जीवनात खूप कष्ट करुन आज हे यश संपादन केले आहे. तुम्ही माणसे गोळा करत राहा, माणसांचे हात तुमच्या कामाला येतील, माणसांची मने जोडा, तीच तुम्हाला सोबत करतील आणि यालाच जीवन म्हणतात, असा कानमंत्र गावस्कर यांनी यावेळी दिला.
   पारळे यांच्या नावातच उदय आहे. म्हणूनच बांधकाम क्षेत्रात मंजुरीसाठी सावंतवाडी आलेले पारळे हे आपल्या मेहनत व जिद्दीच्या जोरावर मोठे उद्योजक बनले. आज बांधकाम क्षेत्रात त्यांचे मोठे नाव आहे. एवढे मोठे होऊन ही त्यांचे पाय अजून जमिनीवरच आहेत व एक प्रामाणिक माणूस म्हणून आम्हा सर्व मित्रांना त्यांचा अभिमान आहे. असे उद्गार या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्योजक शैलेश पै यांनी काढले.
   मी मोठा होण्यामागे माझ्या कष्टा सोबतच माझ्या आई- वडिलांचे मला आशीर्वाद लाभले, त्याचप्रमाणे माझे मामा जयसिंग पाटील यांनी 33 वर्षांपूर्वी आपणाला या क्षेत्रात आणले. त्यानंतर प्रचंड मेहनत करून मी हा व्यवसाय उभा केला.याचे सर्व श्रेय मी माझ्या आई वडील, मोठी माणसे, माझी पत्नी सौ. स्मिता व मित्रपरिवाराला देतो. माझ्याबरोबर माझ्या व्यवसायात काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला मी माझ्या कुटुंबाचा सदस्य म्हणतो. असे आपल्या प्रास्ताविक भाषणात उदय पारळे म्हणाले.
   यावेळी अशोक सारंग, सागर पाटील, सरपंच महेश जामदार, शरद सावंत, नकुल पार्सेकर, अतुल शिरोडकर, विजय सावंत, बाबुराव जाधव, सारस्वत बँक शाखा सावंतवाडीचे व्यवस्थापक, प्रभाकर धुरी, स्वप्निल, नयन यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुमेधा नाईक यांनी केले तर आभार सौ. स्मिता पारळे यांनी मानले.