बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

 

कुडाळ

      कुडाळ येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत प्रशालेच्या चार खेळाडूंची महाराष्ट्र बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे तर नीरजा राजेश पवार ही स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ठरली आहे.प्रशालेची विद्यार्थिनी नीरजा  हिने ९ वर्षांखालील गटात सुवर्णपदक पटकावले, तर ११ वर्षांखालील गटात रौप्यपदक जिंकले. ११ वर्षांखालील गटात याच शाळेची स्वरा योगेश कोळी हिने नीरजा पवारला मात देत जिल्हा अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. इयत्ता दुसरीतील विद्यार्थी विघ्नेश घोगळे याने अंतिम सामन्यात प्रतिस्पर्ध्याचा २१-१६, २१-११ अशा सरळ सेटमध्ये पराभव करत महाराष्ट्र बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले आहे. तर इयत्ता दुसरीचा खेळाडू देवांश कोळी याने द्वितीय क्रमांक पटकावला. या यशामागे प्रशालेचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक रोहिदास राणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. खेळाडूंच्या या यशाबद्दल सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या चैताली बांदेकर आणि संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांनी खेळाडू, त्यांचे पालक आणि क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.