१ ऑगस्टला सावंतवाडीत गुणवंतांचा सन्मान सोहळा....३०० विद्यार्थी आणि ४० हून अधिक शिक्षकांचा होणार गौरव
सावंतवाडी
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव आणि शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग-तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने "गुणवंत विद्यार्थी व शिक्षक गौरव सोहळा – 2026" चे आयोजन शनिवार, दि. 1 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2.30 वाजता सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै नगरपरिषद सभागृहात करण्यात आले आहे. या प्रेरणादायी सोहळ्यात इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांसह 100 टक्के निकाल लावणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा आणि शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाणार आहे. याशिवाय शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 40 हून अधिक शिक्षकांचा विशेष गौरव करण्यात येणार असून एकूण 300 हून अधिक गुणवंत विद्यार्थी या सोहळ्यात गौरविले जाणार आहेत. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. गुणवंतांना प्रेरणा देणे, शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करणे आणि शिक्षण संस्था, पालक व समाज यांच्यातील समन्वय दृढ करणे हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
konkansamwad 
