'मॉड्युलर बिहेव्हियरल ॲनालिसिस चेंबर'ला केंद्र सरकारची डिझाइन नोंदणी

'मॉड्युलर बिहेव्हियरल ॲनालिसिस चेंबर'ला केंद्र सरकारची डिझाइन नोंदणी

 

वेंगुर्ला


       संशोधन क्षेत्रात वेंगुर्ल्यातील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाने राष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी केली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य (प्रो) डॉ. धनराज बाबूगीर गोस्वामी, डॉ. वसंतराव पाटोळे आणि विद्यार्थी संशोधक मनीष धनराज गोस्वामी यांनी विकसित केलेल्या 'मॉड्युलर बिहेव्हियरल ॲनालिसिस चेंबर' या नाविन्यपूर्ण डिझाइनला केंद्र सरकारच्या पेटंट, डिझाइन्स आणि ट्रेड मार्क्स महानियंत्रक कार्यालयाकडून अधिकृत डिझाइन नोंदणी मिळाली आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयातून झालेल्या या संशोधनाला मिळालेली राष्ट्रीय मान्यता विशेष उल्लेखनीय ठरली आहे.वर्तनात्मक अभ्यासात जीवाच्या वर्तनातील बदल आणि प्रतिसादांचा अभ्यास केला जातो, यासाठी सुरक्षित आणि नियंत्रित व्यवस्था गरजेची असते. ही गरज ओळखून हे मॉड्युलर चेंबर तयार करण्यात आले आहे. त्याची रचना मॉड्युलर असल्याने वेगवेगळ्या प्रयोगांनुसार त्यात बदल करता येतात, ज्यामुळे निरीक्षणातील अचूकता वाढते आणि त्रुटी कमी होतात. मानसशास्त्र, प्राणीशास्त्र, जैविक विज्ञान यासारख्या क्षेत्रात हे डिझाइन उपयुक्त ठरणार आहे.या डिझाइनची भारत सरकारच्या डिझाइन्स ॲक्ट २००० अंतर्गत Class 24-02 मध्ये नोंदणी झाली असून डिझाइन क्रमांक 492501-001 आणि प्रमाणपत्र क्रमांक 248362 आहे. ही नोंदणी १० वर्षांसाठी वैध असून पुढे ५ वर्षांसाठी वाढविता येते.या संशोधनाचे वैशिष्ट्य म्हणजे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी एकत्रितपणे केलेले काम. प्राचार्य डॉ. गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी संशोधक मनीष गोस्वामी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यामध्ये डॉ. सुवर्णा कदम, डॉ. मिनाक्षी गुरव, श्री. मकरंद करवाल, डॉ. सचिन साळवे आणि श्री. कृष्णा बेलदार यांचेही मोलाचे योगदान लाभले.या यशामुळे वेंगुर्ल्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, चेअरमन प्रा. डॉ. मंजिरी मोरे, अध्यक्षा शिवानी देसाई यांच्यासह सर्व स्तरातून संशोधक चमूचे अभिनंदन होत आहे.