एसटी कामगारांचे राज्यव्यापी आंदोलन; सिंधुदुर्ग शिवसेना उबाठा पक्षाचा पाठिंबा

सिंधुदुर्ग
एसटी कामगारांची वेतनवाढ आणि भत्त्यांमध्ये प्रलंबित असलेला आर्थिक फरक मिळावा या मागणीसाठी १३ ऑक्टोबर २०२५ पासून एसटी महामंडळ संयुक्त कृती समितीतर्फे तीव्र स्वरूपाचे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. वैभव नाईक यांनी शिवसेना एसटी कामगार सेनेच्या पदाधिकारी व सदस्यांना आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
मागण्या
- १ एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीतील वार्षिक वेतनवाढ व घरभाडे भत्त्याची प्रलंबित थकबाकी
- सन २०१८ पासून महागाई भत्त्याचा फरक
- १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२४ या चार वर्षाचा ६,५०० रुपये वेतनवाढीचा प्रलंबित फरक
- शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ५५% महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता १०, २०, ३०% दराने लागू करणे
- दिवाळी भेट ₹१५,००० व सणभत्ते ₹१२,५००
- कंत्राटी नोकरभरती रद्द करून नियमित नोकरभरती प्रक्रिया राबविणे
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांचे वेतन
- संपूर्ण थकबाकीची रक्कम एकरकमी देणे
- निवृत्त कर्मचाऱ्यांना १ वर्षाचा मोफत पास व थकीत देणी एकरकमी देणे
- पीपीपी तत्वावर नव्हे तर महामंडळाने स्वतः जागांचे विकास करणे
या मागण्यांसाठी आंदोलनात एसटी कामगार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, असे एसटी महामंडळ संयुक्त कृती समितीने सांगितले आहे.