महायुतीच्या प्रचारात सहभागी व्हा; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश.

महायुतीच्या प्रचारात सहभागी व्हा; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश.

मुंबई.

  मनसेने महायुतीला बिनशर्त पाठींबा देण्याची घोषणा राज ठाकरेंनी केल्यानंतर रायगड लोकसभा मतदारसंघातील मनसेचे पदाधिकारी नाराज झाले असून त्यांनी महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांच्याबाबत अनेक आक्षेप घेत आपण त्यांचा प्रचार करणार नाही, असे स्पष्टपणे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना सांगितले आहे. त्यासाठी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवतीर्थवर जाऊन राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान, राज ठाकरेंनी त्यांची समजूत काढली असून महायुतीच्या प्रचारात भाग घ्या, असे आदेश दिल्याचे वृत्त आहे.
   राज ठाकरे यांच्यासोबत उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रायगडमधील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. ज्यांनी मनसे संपवण्याचं ज्यांनी काम केलं, त्यांच्याविरोधात प्रचार केला, आमच्यावर नेहमी खोट्या केसेस दाखल केल्या गेल्या, कोकणात गेली २० वर्षे मनसेची वाटचाल संघर्षमय राहिली आहे. ही सर्व परिस्थिती मनसे सैनिकांनी राज ठाकरे यांच्यासमोर मांडली. मग आता त्यांचे काम कसे करायचे? त्यांचा प्रचार कसा करायचा? अशा तक्रारी केल्या.
    कोकणातून २०० मनसे सैनिक आलेले होते. राज ठाकरे यांनी सर्वांचे म्हणणे ऐकल्यावर या सर्वांची समजूत काढली आणि तुम्ही प्रचारात भाग घ्या अशा सूचना दिल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली. या भेटीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी या कुरबुरी असल्याने कार्यकर्ते नाराज असल्याचे मान्य केले. देशपांडे म्हणाले की, स्थानिक पातळीवर या तक्रारी आहेत, त्या संदर्भात योग्य तो निर्णय राज ठाकरे यांनी घेतला असून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. महायुतीच्या उमेदवाराचा कार्यकर्ते प्रचार करतील असे देशपांडे म्हणाले.