कोकणातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देताना केंद्र सरकार उदासीन-मुझम्मील काझी.
रत्नागिरी.
कोकणातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देताना केंद्र सरकार उदासीन आहे, असे गाव विकास समितीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते मुझम्मील काझी यांनी म्हटले आहे.
ग्राम विकास मंडळ शिगवण वाडी परचुरी येथे नुकताच वार्षिक स्नेह संमेलन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी गाव विकास समितीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते मुझम्मील काझी यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. मुझम्मील काझी यांनी पुढे मार्गदर्शन करताना सांगितले की, गेली दहा वर्षे रिफायनरीच्या नावाखाली कोकणाला फक्त गाजर दाखवले गेले. जर केंद्र सरकारला इथल्या स्थानिकांना रोजगारच द्यायचा असेल तर पर्यावरण पूरक असे उद्योग धंदे तसेच प्रकल्प आणले पाहिजेत.
कोकण बोर्डाची मुले १० वी १२ वीच्या परीक्षेत प्रथम येतात मात्र त्यांच्या शिक्षणानुसार योग्य तो रोजगार कोकणात उपलब्ध नाही. आणि म्हणून इथला तरुण मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत आहे. गावेच्या गावे ओस पडत चालली आहेत. इथली शेती संपत चालली आहे. इथल्या तरुणांच्या हाताला रोजगार नाही. आपण आपल्या राजकीय पुढाऱ्यांना याचा जाब विचारला पाहिजे. यावेळी मंचावर परचुरी गावच्या सरपंच सौ. शर्वरी वेल्ये, उपसरपंच प्रदीप चंदरकर, पं. स. उपसभापती परशुराम वेल्ये, डॉ. विनायक पेठे, अनंत शिंदे, डॉ.चंद्रकांत लिंगायत, सुहास घाणेकर, ग्रा. प.सदस्य संतोष माटल, उक्षी गावचे उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे, रमेश मेस्त्री, विनायक शिगवण, गावप्रमुख भिकाजी कळंबटे, तसेच मंडळाचे वाडीप्रमुख अर्जुन शिगवण, कार्यवाह यशवंत शिगवण,अध्यक्ष मधुकर शिगवण, उपाध्यक्ष मंगेश शिगवण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.