देवगड येथे सापडले 15 फूट खोल रहस्यमय 'विवर'

देवगड
देवगड तालुक्यातील साळशी येथील गणपत (बाळा) नाईक यांच्या साळशी - देवणेवाडी येथील आंबा, काजू बागेत अचानक रहस्यमय विवर आढळले आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.नाईक हे बागेची साफसफाई करत असताना एका कामगाराचा पाय अचानक जमिनीत गेल्याने या विवराचा शोध लागला. सुरुवातीला जमिनीवर केवळ 8 इंच रुंदीचे दिसणारे हे विवर बॅटरीच्या प्रकाशात पाहिल्यानंतर तब्बल 15 फूट खोल असल्याचे दिसून आले. हे विवर जमिनीवरुन खाली सरळ रेषेत खोल दिसत असून मोठ्या विहिरीसारखे दिसत आहे. मात्र अंधारामुळे नेमका अंदाज येत नाही. विशेष म्हणजे, साळशी गावात नदी, नाले किंवा मोठे जलस्रोत नसतानाही असे विवर अचानक कसे निर्माण झाले, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.गणपत नाईक यांच्या बागेत गेल्या 35 वर्षांत असा प्रकार कधीही घडलेला नव्हता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक भूगर्भशास्त्र तज्ञ आणि विज्ञान शिक्षक पृथ्वीराज बर्डे यांना घटनास्थळी बोलावण्यात आले आहे. लवकरच या रहस्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. यापुर्वीही कोळोशी येथे अश्मयुगीन गुहा, दगडी हत्यारे आणि कातळशील्पे सापडली होती.दरम्यान, ग्रामस्थांमध्ये याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत. काहींच्या मते हे पूर्वीचे एखादे भुयार असावे, तर इतरांच्या मते हे भूगर्भीय हालचालींमुळे तयार झाले असावे. तज्ज्ञ तपासणी केल्यानंतर या रहस्यमय विवराचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.