मालवण येथे नारळी पौर्णिमेला होणारी रिक्षा रॅली रद्द

मालवण
नारळी पौर्णिमेनिमित्त शहरात काढण्यात येणाऱ्या रिक्षा रॅलीमुळे नारळी पौर्णिमा उत्सवावेळी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असल्याचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी सांगितले. त्यामुळे ही रिक्षा रॅली रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष व पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर आणि तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर यांनी दिली. मालवण भाजपा, पर्यटन व्यावसायिक महासंघ, तारकर्ली पर्यटन विकास संस्था व रिक्षा व्यावसायिक संघटना यांच्यावतीने नारळी पौर्णिमेनिमित्त ८ ऑगस्टला मालवण भरड नाका ते बंदर जेटी येथे रिक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत येथील पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी पर्यटन व्यावसायिकांना पाचारण करून चर्चा केली. यावेळी बाबा मोंडकर, सहदेव साळगावकर, रवींद्र खानविलकर, अन्वेषा आचरेकर, शेखर गाड, महिमा मयेकर, दिक्षा गांवकर, रामा चोपडेकर आदी उपस्थित होते.यावेळी झालेल्या चर्चेत पोलीस निरीक्षक श्री. जगताप यांनी या रिक्षा रॅलीमुळे मालवणमध्ये नारळी पौर्णिमा उत्सवा दिवशी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असल्याने प्रतिकात्मक एक दोन रिक्षा घेऊन रॅली काढावी व प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती केली. त्यावर बाबा मोंडकर यांनी अन्य ठिकाणी निघणारी रिक्षा रॅली व मालवणात निघणारी रिक्षा रॅली यामध्ये फरक असून मालवणात रिक्षा पर्यटन पूरक सजावट करून रॅलीत सहभागी होतात, त्यामुळे सहभागी रिक्षा पैकी एक दोन रिक्षा सहभागी करणे संयुक्तीक नसल्याने नारळी पौर्णिमेनिमित्त मालवण बंदर जेटी येथे नागरिकांना उद्धवणाऱ्या त्रासाचा विचार करून मालवण बंदर जेटी येथे येणाऱ्या नागरिकांचा विचार करून रिक्षा रॅली रद्द करीत आहोत, असे सांगितले. परंतु रिक्षा व्यावसायिकांच्या सोबत आम्ही असून त्यांना पर्यटनपूरक व सकारात्मक व्यवसाय वाढ होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे श्री. मोंडकर व श्री. साळगावकर यांनी सांगितले.