बदलापूर आंदोलनाला हिंसक वळण; शाळा, रेल्वे स्थानक व पोलिसांवर तुफान दगडफेक. रेल रोकोवर आंदोलक ठाम.

बदलापूर आंदोलनाला हिंसक वळण; शाळा, रेल्वे स्थानक व पोलिसांवर तुफान दगडफेक.   रेल रोकोवर आंदोलक ठाम.

बदलापूर.

 बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर पालकांचा आज उद्रेक झाला आहे. सकाळ पासून सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालं आहे. संतप्त आंदोलकांनी शाळेसमोर आणि बदलापूर स्थानकात रेल रोको आंदोलन सुरू केलं आहे. या  आंदोलना दरम्यान, जमावाने शाळेवर, रेल्वेस्थानकावर व पोलिसांवर दगडफेक केली आहे. तसेच रेल रोको आंदोलनावर आंदोलक ठाम आहे. यासोबतच चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी देखील नागरिकांनी लावून धरली आहे.
   बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आल्यानंतर शहरातील वातावरण प्रचंड तापले आहे. मंगळवारी सकाळपासून बदलापूरमध्ये पालक आणि सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आज सकाळी संतप्त नागरिकांनी मुलींवर अत्याचार झाला त्या शाळेवर मोर्चा काढला. मात्र, तीन तास उलटून शाळा प्रशासनाकडून त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी कोणीही पुढे आली नाही.
   त्यावेळी आंदोलकांनी आपला मोर्चा बदलापूर  रेल्वे स्थानकाकडे वळवत मध्य रेल्वेची वाहतूक रोखून धरली. गेल्या काही तासांपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्याने मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेन अडकून पडल्या आहेत. पोलिसांनी या आंदोलकांना रेल्वे रुळांवरुन हटवण्याचा प्रयत्न केला. रेल्वे पोलिसांचे एक पथक आंदोलकांना हटवण्यासाठी त्यांच्यावर लाठीमार करण्याच्या तयारीत होते. मात्र, रेल्वे पोलिसांची तुकडी आपल्या दिशेने येताना दिसताच आंदोलकांनी तुफान दगडांचा मारा केला. त्यामुळे रेल्वे पोलिसांच्या पथकाने माघार घेत आंदोलकांशी पुन्हा चर्चा करण्याचा मार्ग स्वीकारला.
   बदलापूरमध्ये शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ नागरिक रेल्वे रुळावर उतरले आहेत. सकाळी १० वाजतापासून हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे गेल्या दोन तासांपासून कल्याण कर्जत मार्गावर लोकलसेवा ठप्प झाली आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली असून शहरातील मुख्य रस्त्यावरही टायर पेटवण्यात आले. पोलिसांनी आंदोलकांना रेल्वे ट्रॅक मोकळा करण्याची विनंती केली. मात्र, संतप्त जमावाने पोलिसांवर आणि रेल्वे स्थानकावर व शाळेवर दगडफेक केली आहे. पोलिसांनी जमावाला शांततेचे आवाहन केले आहे. या दगडफेकीत काही पोलिस व काही महिला जखमी झाले असल्याची माहिती आहे.