ओरोसची सुकन्या पूर्वा गावडे हिची जागतिक सागरी जलतरण स्पर्धेसाठी निवड

सिंधुदुर्गनगरी
राष्ट्रीय जलतरणपटू पूर्वा संदीप गावडे हिची सिंगापूर येथे होणाऱ्या जागतिक सागरी जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे. पूर्वाने यापूर्वी दिव-दमन येथे झालेल्या खेलो इंडिया सागरी जलतरण स्पर्धेत दोन पदके पटकावून महाराष्ट्राचा झेंडा अभिमानाने फडकावला होता. या दमदार कामगिरीनंतर आता ती जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.मूळची सिंधुदुर्गनगरीची असलेली पूर्वा गावडे सध्या पुणे येथील बालेवाडी येथे प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचे प्रशिक्षण घेत आहे. तर शिक्षणही ती त्याच ठिकाणी पूर्ण करत आहे. नुकतीच तिने बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. जलतरण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत तिने आतापर्यंत राज्यस्तरीय स्पर्धांसह ओरिसा, अहमदाबाद, चेन्नई आणि गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकली आहेत. तिच्या याच सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर तिची खेलो इंडिया सागरी जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली होती. जिथे तिने दोन पदके पटकावली.खेलो इंडिया स्पर्धेतील यशानंतर जागतिक सागरी जलतरण स्पर्धेसाठी बंगळूरु येथे निवड चाचणी घेण्यात आली. या चाचणीतही पूर्वा यशस्वी ठरली आणि तिची सिंगापूर येथे १३ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या ५ किलोमीटरच्या जागतिक जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पूर्वाला आजवरच्या राष्ट्रीय पातळीवरील यशात राष्ट्रीय जलतरण संघटनेचे सेक्रेटरी राजू पालकर आणि पुणे येथील राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.