गॅस कनेक्शन बंद करण्याची धमकी देऊन वृद्धाची २ लाख ३८ हजारांची फसवणूक

गॅस कनेक्शन बंद करण्याची धमकी देऊन वृद्धाची २ लाख ३८ हजारांची फसवणूक

सावंतवाडी


     सावंतवाडी पोलिसांनी झारखंडमध्ये जाऊन सायबर भामट्याला ठोकल्या बेड्या सावंतवाडी पोलिसांनी धाडसी कामगिरी करत गॅस कनेक्शन बंद पडण्याची भीती दाखवून ओरोस येथील एका वृद्ध नागरिकाची २ लाख ३८ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगाराला थेट झारखंडमध्ये जाऊन अटक केली आहे. या कारवाईमुळे सायबर टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.ओरोस येथील वृद्धाला फोन करून त्यांचे गॅस कनेक्शन बंद होणार असल्याचे सांगून सायबर भामट्यांनी विश्वासात घेतले. त्यानंतर विविध क्लृप्त्या वापरून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल २ लाख ३८ हजार ५०० रुपये काढून घेतले. घटना उघडकीस आल्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी तपासाला गती दिली.पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. तांत्रिक माहिती आणि पुराव्यांच्या आधारे आरोपीचा माग झारखंडपर्यंत पोहोचला. त्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने झारखंडला रवाना झाले. अखेर तेथे जाऊन आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, हेड कॉन्स्टेबल श्री. शिंगाडे आणि पोलीस कॉन्स्टेबल उमेश पवार यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.स्थानिक गुन्ह्याचा तपास थेट दुसऱ्या राज्यापर्यंत नेऊन आरोपीला अटक केल्याने पोलिसांच्या तपासकौशल्याचे आणि धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गुन्हेगार कितीही लांब लपला तरी कायद्यापासून सुटका नाही, असा संदेश या कारवाईतून मिळाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम करत आहेत.दरम्यान, गॅस कनेक्शन, बँक खाते, केवायसी, वीज बिल अशा कारणांनी फोन करून फसवणूक करणाऱ्या टोळ्यांपासून वृद्ध नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.