सावंतवाडीत महिलांसाठीच्या असलेल्या कौशल्य विकास शिबिराला उत्तम प्रतिसाद!
सावंतवाडी
सावंतवाडी नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून शहरातील महिला आणि तरुणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर बनवण्यासाठी एका विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत महिलांना फोर व्हीलर व टू व्हीलर ड्रायव्हिंग, ॲडव्हान्स फॅशन डिझाईनिंग, तसेच कॅटरिंग यांसारख्या उपयुक्त व रोजगाराभिमुख विषयांचे शास्त्रीय शिक्षण दिले जात आहे. पालिकेच्या या स्तुत्य उपक्रमाला सावंतवाडीतील महिला व तरुणींकडून तब्बल दोनशेहून अधिक संख्येने अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, या प्रशिक्षण शिबिराला सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोसले यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळेस त्यांनी उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी महिलांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना सामाजिक व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी असे कल्याणकारी उपक्रम सातत्याने राबवले जात असून भविष्यातही यापेक्षाही नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण सभापती सौ. दिपाली भालेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. महिलांच्या प्रगतीसाठी उत्तम आणि नेटके नियोजन केल्याबद्दल नगराध्यक्षांनी सभापती सौ. दिपाली भालेकर आणि त्यांच्या संपूर्ण समितीचे यावेळी विशेष कौतुक केले.
konkansamwad 
