महाराष्ट्र कृषी दिन विशेष लेख... शेतकरी राजा महान...
शेतकरी आहे अन्नदाता...
तोच आहे देशाचा खरा भाग्यविधाता...
शेतातील पिक शेतकऱ्यांच्या हाताने पिकते...
शेतातीलच सोन्याने सर्वांचे पोट भरते...
भरतो तुमचा आमचा पोट...
कष्ट गाळून घाम...
साऱ्या जगाला पुरवितो धान...
असा हा आपला शेतकरी राजा महान...
शेताच्या मातीला स्पर्श करताच मनात एक वेगळाच रोमांच दाटून येत. ऊन, वारा, पाऊस या साऱ्यांच्या साक्षीने आपल्या शेतकऱ्यांच्या हातून नवा हिरवा स्वप्नवेल उगवतो. शेतकरी हा समाजाचा खरा पोशिंदा आहे. कारण शेती म्हणजे केवळ एक प्रेरणा नाही, तर ती एक जीवनशैली आहे. प्रत्येक बिजामध्ये भविष्याची आशा रुजवणारा शेतकरी, आपल्या घामाच्या थेंबानी मातीला सोन करतो. अन्न, वस्त्र, आणि निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करणारे शेतकऱ्यांचे योगदान अमूल्य कृषी दिनाच्या निमित्ताने त्यांच्या कष्टांना सलाम केला जातो. आपला महाराष्ट्र हा कृषिप्रधान राज्य आहे, आपला अन्नदात्या शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून दरवर्षी १ जुलै रोजी ''कृषी दिन" साजरा केला जातो, त्यासोबत हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त कृषी दिन म्हणूनही साजरा करतो. शेतकऱ्यांच्या समस्यांचे चर्चेत मुख्य विषय मांडले जाऊन त्यावर तोडगे काढले जातात. शेतकरी म्हणजे आपल्या देशाचा खरा अन्नदाता. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता तो आपल्या शेतात राबतो, आपल्या सर्वांच्या पोटात अन्न घालतो. म्हणून कृषी दिनाच्या निमित्ताने आपण शेतकऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांचा योगदानाचा गौरव करतो. या दिवशी शेतकरी बांधवांसाठी विविध कार्यक्रम, सन्मान सोहळे, मार्गदर्शन शिबिर आयोजित केली जातात. मात्र आज त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पावसावर अवलंबून असलेली शेती, वेळेवर बियाणे, खते आणि कीटकनाशके मिळण्यात येणाऱ्या अडचणी, उत्पादनात योग्य भाव न मिळणे, कर्जाचा वाढत बोजा आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. शासन विविध योजना राबवत असली तरी अनेकदा त्या योजनांचा लाभ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. या सगळ्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य वाढते आणि आत्महत्येचे प्रमाण ही चिंताजनक आहे. या समस्या सोडवण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करणे, शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान आणि योजना पोहोचवणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे. कृषी दिन आपल्याला आठवण करून देतो की, शेतकरी सुखी तर देश सुखी. म्हणून आजचा हा कृषी दिन म्हणजे केवळ शेतकऱ्यांच्या कष्टाचा गौरव नव्हे, तर आपल्या मातीशी असलेल्या नात्याचा उत्सव साजरा करतो...

konkansamwad 
