बंधुत्वाचा, स्नेहाचा आणि निरागस नात्यांचा उत्सव–रक्षाबंधन!

सावळ्या सकाळी साजरा तो दिवा..
रक्षाबंधन आला आनंदाचा ठेवा ..|
हातात राखी, डोळ्यात प्रेम,
भाऊ बहिणीचे नाते, अमोल रत्नजडित नेम...|
श्रावणाच्या पावसाळी झुळूकात, आभाळाच्या तरंगणाऱ्या पांढऱ्या करड्या ढगात आणि पावसाच्या थेंबात एक वेगळीच ऊब दडलेली असते. कारण हाच तो काळ–बंधुत्वाचा, स्नेहाचा आणि निरागस नात्यांचा उत्सव– रक्षाबंधन! "काही नाती रक्तातून असतात, काही आत्म्यांच्या नात्यांनी जपली जातात. यांपैकी एक आहे भाऊ बहिणीच नात जे काळाच्या ओघात कधीही न संपणार आहे. रक्षाबंधन म्हणजे नावाप्रमाणेच फक्त "रक्षणाचा धागा" नव्हे, तर बालपणापासून जोपासलेली आठवणींची शृंखला आहे. बालपणीचा तो दिवस आठवला की, डोळ्यात पाणी तर ओठांवर हसू येत. या दिवशी घरातला वातावरण कस वेगळच असत! बहिणीच्या मनात उत्साह, भावाच्या मनात जपणूक. बहिणीने प्रेमाने थाळी सजवलेली, त्यात फुल, अक्षता, रोली, गोडधोड आणि राखी. राखी बांधताना बहिणीचा थरथरता हात, तिच्या प्रार्थनांचे शब्द–“माझा भाऊ सुखी आणि निरोगी राहो" हे ऐकून भावाच्या मनात एक नि:शब्द वचन उमटत–"तुझ रक्षण आयुष्यभर करीन" राखी म्हणजे फक्त एक धागा नाही, तर नात्यांचे बंधन आहे ; जणू प्रेम, काळजी, विश्वास यांचा प्रतीक. आजच्या जगातही ही परंपरा जिवंत आहे, कारण नाती केवळ रक्तांच्या नात्यांनी नाही, तर मनाच्या जवळीकने टिकतात.आजकाल शहरात राख्या दुकाने, मॉल आणि ऑनलाईन हिसाबाने पोहोचतात, गावी अजूनही बहीण स्वतः हाताने राखी विणते. प्रत्येक गाठींमध्ये तिच प्रेम, काळजी आणि आशीर्वाद दडलेला असतो. अगदी जरी भाऊ परदेशात असला तरी पत्र, व्हिडिओ कॉल किंवा कुरियर मधून राखी पोहोचते. कारण बंध हे अंतराने कधीच तुटत नाही.रक्षाबंधन हे फक्त सण नाही, तर देशातील नात्यांच महत्त्व शिकवणारा उत्सव आहे. कारण तो आपल्याला सांगतो–“धागा जरी साधा असला, तरी ती माणसच खरी श्रीमंती आहेत."