कोलगाव शाळेत औषधी वनस्पती कार्यशाळा व प्रदर्शन उत्साहात संपन्न

कोलगाव
वनशक्ती संस्थेच्या वतीने कोलगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे औषधी वनस्पतींवर एक दिवसीय कार्यशाळा व प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक मेस्त्री, सचिव सौ. पुनम नाईक, वनशक्तीच्या प्रकल्प अधिकारी करिश्मा मोहिते, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात औषधी वनस्पती व त्यांच्या दैनंदिन जीवनातील उपयोगांवर आधारित माहितीपूर्ण सादरीकरणाने झाली. या सत्राचे मार्गदर्शन वनशक्तीच्या प्रकल्प अधिकारी करिश्मा मोहिते यांनी केले. या सादरीकरणात तुळस, गुळवेल, आवळा, गवती चहा, कोरफड, आणि भुईआवळ्यासारख्या सहज उपलब्ध असलेल्या औषधी वनस्पतींचा वापर कसा करता येतो, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी ‘औषधी वनस्पतींचे महत्त्व’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने आपले विचार मांडले. ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक ज्ञानाची आवड निर्माण करणारी ठरली. या स्पर्धेमध्ये दुर्वा गोविंद सावंत हिने प्रथम, अपेक्षा आपा राऊळ हिने द्वितीय तर सानवी दिलीप तिळवे हिने तृतीय क्रमांक पटकावला. या कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे औषधी वनस्पतींचे सजीव नमुने आणि त्याबरोबर माहितीपूर्ण पोस्टर्सचे प्रदर्शन. या प्रदर्शनात विविध स्थानिक औषधी वनस्पतींच्या वापर, वैज्ञानिक नाव, आणि उपयोग यांची माहिती देण्यात आली होती. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वनस्पती पाहण्याची आणि त्याबाबत मार्गदर्शन घेण्याची संधी मिळाली.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात फुलांपासून बनवता येणाऱ्या नैसर्गिक पेयांचे (जसे की जास्वंद , गोकर्ण) प्रात्यक्षिक घेण्यात आले. या माध्यमातून आरोग्यदायी आणि रासायनिकरहित जीवनशैलीचा संदेश दिला गेला.या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये पारंपरिक ज्ञानाविषयी कुतूहल निर्माण झाले असून, औषधी वनस्पतींच्या संवर्धनाची जाणीव निर्माण झाली. वनशक्ती संस्था अशा प्रकारचे उपक्रम नियमितपणे राबवत असून स्थानिक जैवविविधतेच्या संवर्धनासाठी समाजात जनजागृती करीत आहे