शक्तिपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडण्यात यावा......आमदार दिपक केसरकर करणार मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सावंतवाडी
शक्तिपीठ महामार्ग हा रेडी बंदराला जोडण्यात यावा, तशाप्रकारे फेरसर्वे करावे अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती माजी शालेय शिक्षण मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी दिली तर दोडामार्ग तालुक्यातील हत्तींचा प्रश्न लक्षात घेता आपण कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक रामानुजन यांची हकालपट्टी करण्याची मागणी वनमंत्र्यांकडे करणार असल्याचेही केसरकर म्हणाले.आमदार केसरकर यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख संजू परब, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस उपस्थित होते. सावंतवाडी इन्सुली ते सासोली, वेंगुर्ला ते मळेवाड या ठिकाणी अंडरग्राउंड केबल टाकण्याची गरज आहे. त्या संदर्भात आपण वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्याशी चर्चा केली आहे. ते त्या संदर्भातील प्रस्ताव आपल्याला सादर करणार असून हा प्रस्ताव घेऊन लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. सावंतवाडी शहर आणि कणकवली शहरातही अंडरग्राउंड संदर्भात विचार केला जाणार. तशाप्रकारे आपण पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे केसरकर म्हणाले. सावंतवाडी तालुक्यातील आरोग्याच्या प्रश्नाबाबतही आपण सकारात्मक असून लवकरच जिल्हा शल्य चिकित्सक व संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेणार आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये फिजिशियनची आपली आग्रही मागणी आरोग्यमंत्र्यांकडे राहणार आहे. येत्या आठवड्यात हा प्रश्न मार्गी लागेल. ज्याप्रमाणे या ठिकाणी डायलेसीसची सुविधा देण्यात आली तशीच सुविधा लवकरच वेंगुर्ला, शिरोडा आणि दोडामार्ग येथेही सुरु करण्यात येईल. येथे येणाऱ्या डॉक्टरांना अतिरिक्त वेतन सीएसआर फंडातून देण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे केसरकर म्हणाले. जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती या होऊ घातलेल्या निवडणूका युतीच्या माध्यमातून एकत्र लढाव्यात अशी आपली इच्छा आहे. शिवाय राज्यात सत्ता महायुतीची असल्याने या ठिकाणी होणारी विकास कामांची भूमिपूजने ही युतीच्याच माध्यमातून व्हावी अशी आपली भावना आहे. जे कोणी यामध्ये खोड करतात त्यांची हकालपट्टी भविष्यात लोकच करतील असही ते म्हणालेत.