इंग्लंडला लोळवत भारताचा फायनलमध्ये रूबाबात प्रवेश; दक्षिण आफ्रिकेशी होणार फायनलचा मुकाबला.

इंग्लंडला लोळवत भारताचा फायनलमध्ये रूबाबात प्रवेश; दक्षिण आफ्रिकेशी होणार फायनलचा मुकाबला.

गयाना.

  टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाने दुसऱ्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडवर 68 धावांनी मात करत 2022 च्या पराभवाचा वचपा घेतला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांसमोर इंग्लंडने लोटांगण घातलं. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडला 103 धावावंर गुंडाळलं. टीम इंडियाची ही टी 20 वर्ल्ड कप इतिहासात फायनलमध्ये पोहचण्याची तिसरी आणि 2014 नंतर पहिली वेळ ठरली आहे.
   या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकला आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं निमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि विराट कोहलीची जोडी मैदानावर आली. या सामन्यात विराट कोहलीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र या सामन्यातही तो स्वस्तात माघारी परतला. तो ९ चेंडूत ९ धावा करत माघारी परतला. त्यानंतर रिषभ पंतही अवघ्या ४ धावा करत माघारी परतला. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. विराट आणि रिषभ स्वस्तात माघारी परतल्यानंतर, रोहित आणि सूर्यकुमार यादववर मोठी जबाबदारी होती. दोघांनी मिळून संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं. रोहितने चौकार - षटकार मारत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
   मात्र त्यानंतर तो ५७ धावा करत माघारी परतला. सूर्यकुमार यादवला अर्धशतक झळकवण्याची संधी होती. त्याने ३६ चेंडूंचा सामना करत ४७ धावांची खेळी केली. शेवटी हार्दिक पंड्याने ख्रिस जॉर्डनच्या षटकात लागोपाठ २ षटकार मारले. तिसऱ्या चेंडूवरही त्याने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो २३ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. शेवटी रविंद्र जडेजाने १७ आणि अक्षर पटेलने १० धावांची खेळी करत संघाची धावसंख्या १७१ धावांवर पोहोचवली. दरम्यान, टिम इंडियाने विजयासाठी दिलेले १७२ आव्हान इंग्लंडच्या फलंदाजांना पेलवले नाही. टिम इंडियाच्या फिरकी गोलंदाजीपुढे इंग्लंडचा संघ १६.४ षटकात १०३ धावांवर गारद झाला. शेवटी टिम इंडियाने ६८ धावांनी विजय मिळवत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला.