राज्यात सूर्य आग ओकणार; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट तर विदर्भात पावसाचा अलर्ट.
पुणे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. तापमानात मोठी वाढ होत आहे. पुढील काही दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात उष्णतेची लाट तर विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणात, मुंबई, ठाणे, रायगड तर मध्य महाराष्ट्रात सोलापूर आणि मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद, बीड येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भात काही जिल्ह्यात वादळी वारे आणि पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारी राज्यात मालेगाव सर्वाधित उष्ण ठरले. येथे सर्वाधिक ४३.८ तर अकोला येथे ४३. ३ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यावर कुठलीही वेदर सिस्टीम कार्यान्वित नाही. महाराष्ट्र राज्यात पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. कोकणात बहुतांश जिल्ह्यात पुढील ३ दिवस हवामान दमट उष्ण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात सोलापूर येथे ४ व ५ तारखेला, मराठवाड्यात बीड येथे ५ तारखेला लातूर व उस्मानाबाद येथे ४ व ५ तारखेला उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भात ७ तारखेला काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघ गर्जना वीजांचा कडकडाट व वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा ताशी वेग ४० ते ५० किलोमीटर असणण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे विदर्भात ६ व ७ तारखेला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.