कुणकेरी येथील हुडोत्सव उत्साहात साजरा.

कुणकेरी येथील हुडोत्सव उत्साहात साजरा.

सावंतवाडी.

   तालुक्यातील कुणकेरी येथील प्रसिद्ध हुडोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. 100 फूट उंच हुड्यावर चढलेल्या अवसारांच्या दिशेने दगडांचा मारा भाविकांनी केला. हजारो भाविकांनी याचीदेही याची डोळा या चित्तथरारक उत्सवाची अनुभूती घेतली. रोंबाट, वाघ शिकार, घोडेमोडनी हे विशेष आकर्षण ठरले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, गोवा, कर्नाटक या राज्यातील भाविकांच्या उपस्थितीत हुडोत्सव उत्साहात पार पडला.
   कुणकेरीतील शिमग्याच्या सातव्या दिवशी होणारा हुडोत्सव जिल्ह्यात प्रसिद्ध व मानाचा असतो. आंबेगावचा श्री देव क्षेत्रपाल, कोलगावचा श्री देव कलेश्वर यांनी बहीण श्री देवी भावईच दर्शन घेतले. तिन्ही गावांच्या सीमेवर ही भावा-बहिणींची भेट झाली. त्यानंतर आंबेगाव, कोलगाव, कुणकेरी गावाची निशाण हुड्याच्या ठिकाणी दाखल झाली. यावेळी तिन अवसार कौल घेतल्यानंतर श्रींचा पालखीसह गगनचुंबी शंभर फुटी हुड्यावर एकामागोमाग एक चढले. यावेळी जमलेल्या भाविकांकडून संचारी अवसारावर दगड मारण्यात आले. विशेष म्हणजे हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थिती होते.
  घोडेमोडणी, वाघाचा खेळ या ठिकाणी पार पडले. वाघ खेळाची परंपरा जपण्यासाठी थेट लंडन मधून श्री. कुणकेरकर गावात दाखल झाले होते. दरवर्षी हे कुटुंब शिमगोत्सवात गावात येतात. यासह पारंपरिक पाथर धनगरणीचा दगड उचलण्याचे पारंपरिक खेळही यावेळी पार पडले. महिला वर्गही या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. हा कार्यक्रम सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरु होता.