८ एप्रिल रोजी वर्षातील पाहिले सूर्यग्रहण.

८ एप्रिल रोजी वर्षातील पाहिले सूर्यग्रहण.

नवी दिल्ली.

    चालू वर्षातील पहिले सूर्यग्रहण सोमवार, ८ एप्रिल रोजी चैत्र महिन्यातील अमावस्येच्या रात्री होत आहे. भारतीय वेळेनुसार ८ एप्रिलच्या रात्री ९:१२ वाजता सूर्यग्रहण सुरू होईल. खग्रासची सुरुवातीची वेळ रात्री १०.१० वाजता असेल, तर समाप्तीची वेळ मध्यरात्री २.२२ वाजताची आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे देशात त्याचे वेध पाळण्याची गरज नसल्याचे पंचाग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच चैत्र अमावस्येशी संबंधित पूजा दिवसभर करता येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र,या ग्रहणाचा वातावरणावर परिणाम जाणवणार असून उष्णतेत वाढ होऊ शकते.हे सूर्यग्रहण अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, मेक्सिको आणि आयर्लंडमध्ये दिसणार आहे. अमेरिकेच्या वेळेनुसार सूर्यग्रहण दुपारी २.१५ वाजता सुरू होईल.हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसले तरी या सूर्यग्रहणाबाबत भारतातील लोकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सूर्यग्रहणाबाबत लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. गेल्या ५० वर्षात पहिल्यांदाच सूर्यग्रहणाबद्दल लोकांना इतकी भीती वाटत आहे. या सूर्यग्रहणाला घाबरण्याचे एक कारण म्हणजे गेल्या ५४ वर्षांत या ग्रहणाचा कालावधी खूप मोठा म्हणजेच ४ तास २५ मिनिटे आहे. यावेळी चंद्राच्या विशेष स्थितीमुळे हे गेल्या ५ दशकांतील सर्वात मोठे सूर्यग्रहण असेल. असे सूर्यग्रहण १९७१ साली दिसल्याचे बोलले जात आहे.
    सोमवती अमावास्येला दिसऱ्या सूर्यग्रहणाच्या दुसऱ्याच दिवशी भारतात हिंदू नववर्ष आणि चैत्र नवरात्रीलाही सुरुवात होत आहे. अशा स्थितीत या सूर्यग्रहणाबाबत अनेकांना प्रश्न पडतो की, सूर्यग्रहणामुळे पूजेसारखी शुभ कार्य करता येतील का? कारण सूर्यग्रहणाच्या दुसऱ्या दिवसापासून चैत्र नवरात्रीलाही सुरुवात होत आहे. या कारणामुळे नवरात्रीचे व्रत पाळणारे लोक संभ्रमात आहेत. मात्र ज्योतिषांच्या मते अमेरिकेत होणारे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे भारतात सुतक कालावधी वैध राहणार नाही. परंतु सूर्यग्रहणाचा प्रभाव भारतासह संपूर्ण जगावर कुठेतरी जाणवणार आहे.
   सूर्यग्रहणाची खगोलीय घटना पाहण्याचे औत्सुक्य सर्वांनाच असते. पण भारतातून ही स्थिती प्रत्यक्ष पाहता येणार नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. तरीही हे सूर्यग्रहण अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या वेबसाईटवर लाईव्ह दाखवले जाणार आहे. याशिवाय नासाच्या यूट्यूब चॅनलवरही हे ग्रहण पाहता येईल. ग्रहण वेगवेगळ्या ठिकाणांहून दाखवण्यासोबतच नासाच्या तज्ज्ञांचे संभाषणही तुम्हाला पाहता येईल.
   सोमवारी रात्री दिसणारे ग्रहण कोरोना महामारीनंतरचे सर्वात मोठे सूर्यग्रहण असल्यामुळे लोक आपल्या आरोग्याबाबतही चिंतेत आहेत.हे संपूर्ण सूर्यग्रहण अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये दिसणार असल्याने केवळ या देशांमध्येच ग्रहण सुरू होण्याच्या १२ तास आधी सुतक सुरू होईल आणि ग्रहण संपेपर्यंत सुरू राहील. मात्र, भारतातून हे ग्रहण दिसणार नसल्याने सुतकाशी संबंधित नियम भारतात लागू होणार नाहीत.