मळगावात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव
सावंतवाडी
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी ला मळगाव येथे भव्य 'सार्वजनिक शिवजयंती उत्सव २०२६' आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, भिल्लवाडी ग्रुपच्या वतीने या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. उत्सवाची सुरुवात पहाटे ५:३० वाजता भव्य मशाल रॅलीने होणार असून, संपूर्ण गाव शिवमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे.
त्यानंतर सकाळी ९:३० वाजता ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक सोहळा पार पडेल. सायंकाळी ५:३० ते ७:३० या वेळेत शिवभक्तांसाठी लेझीम नृत्य, वेषभूषा स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. या स्पर्धांमधील विजेत्यांना बादल चौधरी यांच्या हस्ते आकर्षक ट्रॉफी आणि पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. सायंकाळी ७:३० ते ९:३० या वेळेत सर्व ग्रामस्थांसाठी स्नेहभोजन आणि महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाची सांगता रात्री ९:३० ते ११:३० या वेळेत सादर होणाऱ्या पारंपरिक दशावतार नाटकाने होईल. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच हा उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य आणि यशस्वी होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या सोहळ्याला सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भिल्लवाडी ग्रुप, मळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

konkansamwad 
