कुडाळ येथे दिवाळी मेळाव्याचे आयोजन.

कुडाळ येथे दिवाळी मेळाव्याचे आयोजन.

सिंधुदुर्ग.

    (नवतेजस्विनी) महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत दिवाळी या सणाचे औचित्य साधून ग्रामीण भागांतील माविम बचत गटांनी दिवाळीनिमित्त उत्पादित केलेले विविध खाद्यपदार्थ व दिवाळी साहित्याचे जिल्हास्तरीय "दिवाळी मेळावा " दि. 8 ते 10 नोव्हेंबर 2023 या कालावधीत कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल, पंचायत समिती कुडाळ याठिकाणी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा समन्वय अधिकारी नितीन काळे यांनी दिली आहे.
    या प्रदर्शनाचे उद्घाटन 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता स्वाधार लोकसंचलित साधन केंद्राचे अध्यक्ष मानसी गोविंद धुरी  यांच्या अध्यक्षतेखाली व कुडाळ नगरपंचायतचे नगराध्यक्ष अक्षता अनंत खटावकर यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनात शालेय मुलांचे गोफ नृत्य, महिला फुगडी, महिला नृत्य, खेळ पैठणीचा इ. सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
    महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) महाराष्ट्र शासन अंगीकृत जिल्‍हा कार्यालय या कार्यालयामार्फत जिल्ह्यातील गरीब, गरजू, मागासवर्गीय, विधवा, परीतक्ता, भूमिहीन महिला अल्पभूधारक महिला व वंचित महिलासाठी बचत गटाच्या माध्यमातून महिला  सक्षमीकरणाचे कार्य करीत असून सिंधुदुर्गमध्ये माविम अंतर्गत ग्रामीण भागात 136 गावात 1050 बचत गटांच्या माध्यमातून एकूण 11449 महिला तसेच शहरी भागात 58 वार्डात 275 बचत गटांच्या माध्यमातून एकूण 2849 महिला असे एकूण 14298 महिलांचे संघटन करण्यात आलेले आहे.