आजच्या स्त्रियांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर चालणे गरजेचे : ॲड.किशोर खरात. आनंदवाडी येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.

आजच्या स्त्रियांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर चालणे गरजेचे : ॲड.किशोर खरात.   आनंदवाडी येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.

वेंगुर्ला.

    आजच्या स्त्रियांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर चालणे गरजेचं आहे. सावित्रीबाईंनी जी शिक्षण रुपी गंगा बहुजनांच्या लेकींच्या दारीं आणली त्यात नाहून प्रत्येक लेकी ने आपलं जीवन समृद्ध करून खऱ्या अर्थाने माता सावित्री माईच्या आदर्शवर चालणं गरजेचे आहे.असे प्रतिपादन ॲड.किशोर खरात यांनी आनंदवाडी येथे बोलताना केले.
  डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई शाखा वेंगुर्ला तालुका, दलित सेवा मंडळ, व सावित्रीबाई महिला मंडळ वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांची जयंती डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे साजरी करण्यात आली.यावेळी विचारमंचावर सावित्रीबाई महिला मंडळ अध्यक्ष सुहानी जाधव, सावित्रीबाई महिला मंडळ उपाध्यक्ष गीतांजली जाधव,सावित्रीबाई महिला मंडळ सचिव यशस्वी जाधव,दलित सेवा मंडळ अध्यक्ष सुहास जाधव, बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई शाखा वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष गजानन जाधव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष किरण जाधव आदी उपस्थित होते.
  कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
   पुढे बोलताना ॲड.खरात असे म्हणाले की, स्त्रीचे शिक्षण आणि तिचा उद्धार करण्यात आपले संपूर्ण जीवन समर्पित करून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समाजविकासाच्या कामात देखील सहकार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ साली सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झाला. त्यांचा विवाह लहानपणीच म्हणजे वयाच्या फक्त ९ व्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. लहानपणापासून सोसलेल्या जातीयतेच्या वेदना आणि रुढीपरंपरा यांचा दाह सहन करत दोघे मोठे होत होते. शिक्षणाचं महत्त्व त्यांना लहाणपणीच कळलं होतं.
महात्मा ज्योतिबा फुले स्वतः शिक्षण घेऊन समाजकार्यात आरूढ झाले. त्यांनी पुन्हा सावित्रीबाई फुले यांना देखील शिक्षित केले. कर्मकांडाला आणि मानवतेच्या विरूध्द असणाऱ्या रुढी परंपरांना सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांचा कडकडून विरोध होता. हे सर्व जर थांबवायचे असेल तर समाजाला शिक्षणाची गरज आहे याची जाणीव त्यांना झाली. प्रथमतः त्यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली.मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ आणि प्रसार करत असताना या दाम्पत्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण व समाजकार्यासाठी घराबाहेर पडावे लागले. ज्योतिरावांच्या कार्यात त्यांनी पूर्णपणे साथ देण्याचा निश्चय त्यांनी केला होता. सावित्रीबाई फुले अगोदर अशिक्षीत होत्या. त्यांना ज्योतिराव फुले यांनी घरी शिकविले व नंतर शाळेत शिक्षण देण्याचे कार्य सावित्रीबाईंनी केले.समाजात बालविवाहामुळे अनेक मुली गरोदर असताना विधवा झाल्या होत्या. फुले दाम्पत्याने १८६३ रोजी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून एक प्रसूतिगृह सुरू केले. केशवपनाविरुद्ध नाभिकांचा संप कामगार नेते नारायण लोखंडे यांनी घडवून आणला.त्यामागे सावित्रीबाईंचे सहकार्य आणि प्रेरणा त्यांना लाभली. विधवा आईच्या पोटी जन्म घेणाऱ्या यशवंतला दत्तक घेऊन सावित्रीबाईंनी त्याला शिक्षण दिले व त्याला डॉक्टर बनवले.जुलै १८८७ मध्ये ज्योतिरावांना पक्षाघाताचा आजार झाला. त्यांच्या आजारपणात सावित्रीबाईंनी त्यांची सेवा केली असे सांगितले.
   यावेळी वाय.जी कदम, गुरुनाथ जाधव, वामन कांबळे, सुरेश जाधव, लाडू जाधव, गौतम जाधव, प्रज्ञेश जाधव, तसेच सावित्रीबाई महिला मंडळ पदाधिकारी, सभासद व धम्म बांधव - भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिद्दी जाधव यांनी केले.तर उपस्थित सर्वांचे आभार अमोल जाधव यांनी मानले.