खर्डेकर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मार्गदर्शन सत्र संपन्न.

खर्डेकर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मार्गदर्शन सत्र संपन्न.


वेंगुर्ला 
     भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि वेंगुर्ल्यातील बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने "मराठी भाषा रोजगाराच्या संधी" या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख वक्ते व भाषा सल्लागार समितीचे सदस्य डॉ. प्रकाश परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर  कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.मारुती भिवा चौगुले, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य याचे पर्यवेक्षक अभयराजे कुलकर्णी, अधीक्षक दशरथ नाईक, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, मराठी विभाग प्रमुख डॉ पी.आर.गावडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. दिलीप शितोळे आदि मान्यवर उपस्थित होते. मराठी विभागप्रमुख डॉ.पी.आर. गावडे यांनी प्रास्ताविक करीत मराठी भाषा आणि सिंधुदुर्ग मधील साहित्य या विषयी माहिती दिली.भाषा संचालनालयाचे  पर्यवेक्षक अभयराजे कुलकर्णी यांनी शासन व्यवहारात मराठी भाषेचा वापर  व त्यामधील भाषा संचालनालयाचे योगदान किती महत्वपूर्ण आहे याबद्दल विस्तृत माहिती दिली. तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने शासनाबरोबरच लोकांच्यादेखील जबाबदाऱ्या कशा वाढल्या आहेत याबाबत सखोल मार्गदर्शन केले. 
     त्यानंतर प्रमुख वक्ते डॉ. प्रकाश परब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेच्या व्यावसायिक महत्त्वावर भर दिला. मराठी भाषेचा केवळ साहित्य, कला, आणि संस्कृतीपुरता मर्यादित विचार न करता तिचा आधुनिक व्यावसायिक क्षेत्रांमध्ये अधिकाधिक उपयोग झाला पाहिजे. भाषांतर, डिजिटल माध्यमे, आणि स्थानिक भाषांमध्ये संवादाच्या वाढत्या गरजा या मराठीच्या रोजगाराच्या नव्या वाटा आहेत असे ते म्हणाले. मराठी भाषेत चांगली लेखनकला, संपादन, आणि संवादकौशल्य असलेल्या युवकांना आता जागतिक व्यासपीठावरदेखील मोठ्या संधी आहेत. सरकारी योजना, स्थानिक व्यवसाय, आणि आंतरराष्ट्रीय भाषांतर क्षेत्रांमध्ये मराठी भाषकांना मोठी मागणी आहे, असे ते म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेतील तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवनवीन व्यवसाय उभारणीसाठी प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मारुती चौगुले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेचे शिक्षण, संशोधन आणि त्याचा उद्योगांशी जोडण्याच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला.कार्यक्रमामध्ये  उपस्थित विद्यार्थ्यांना व श्रोत्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली गेली त्यावेळी  विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे  डॉ. परब सर व  कुलकर्णी सर यांनी दिली.मराठी भाषेतील रोजगाराच्या संधी कोणत्या क्षेत्रांमध्ये उपलब्ध आहेत? मराठी भाषेचे कौशल्य विकसित करण्यासाठी कोणत्या तांत्रिक शिक्षणावर भर द्यावा?भाषांतर आणि सामग्री लेखन क्षेत्रात मराठी भाषेतील व्यक्तींना आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळू शकते का?सरकारकडून मराठी भाषेच्या प्रचारासाठी कोणत्या योजना राबवल्या जात आहेत?मराठी भाषेला डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी कोणते पाऊल उचलता येईल? साहित्यनिर्मिती आणि प्रकाशन क्षेत्रात मराठी लेखकांसाठी किती संधी आहेत? फ्रीलान्सिंग किंवा ऑनलाइन व्यवसायांमध्ये मराठी भाषिकांना कसा फायदा होऊ शकतो? मराठी भाषेतील विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये किती प्रमाणात संधी उपलब्ध आहेत? स्थानिक व्यावसायिक क्षेत्रात मराठीचा वापर वाढवण्यासाठी कोणते उपक्रम राबवायला हवेत? मराठीतील डिजिटल सामग्री निर्मितीसाठी विशेष प्रशिक्षण केंद्रे उपलब्ध आहेत का? या प्रश्नांवर वक्त्यांनी सखोल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या शंका दूर केल्या आणि मराठी भाषेच्या विकासासाठी नवी दिशा दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. सचिन परुळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.सुनिता जाधव  यांनी केले.