मल्ल सम्राट प्रतिष्ठान सामाजिक कार्यात संपूर्ण कोकणात एक वेगळा इतिहास घडवेल माजी नगराध्यक्ष संजू परब यांचे गौरवोद्गार.
सावंतवाडी
सावंतवाडी येथील मल्ल सम्राट प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक विधायक उपक्रम राबवत असते. येत्या २० ऑक्टोबर रोजी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित 'मोफत आरोग्य शिबीर व मोफत औषधे वाटप' कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा असून आगामी काळात मल्ल सम्राट प्रतिष्ठान सामाजिक कार्यात संपूर्ण कोकणात एक वेगळा इतिहास घडवेल, असे गौरवोद्गार सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी काढले. परब यांच्या कार्यालयात मल्ल सम्राट प्रतिष्ठानच्या जर्सीचे अनावरण संजू परब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मल्ल सम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, सचिव पैलवान ललित हरमलकर, खजिनदार पैलवान गौरव कुडाळकर, पीआरओ साबाजी परब, पैलवान दादू हरमलकर, नेहा ढोले, आयान शेख, मृणाल शिरोडकर,समीर पालव यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान मलसम्राट प्रतिष्ठानच्या वतीने येत्या २० ऑक्टोबर रोजी कोलगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या सभागृहात मोफत आरोग्य तपासणी शिबीर व मोफत औषधे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सावंतवाडी तालुक्यातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष जावेद शेख यांनी केले आहे.