सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर रणजी सामन्यांचा थरार रंगणार.....राष्ट्रीय दर्जासाठी उपनगराध्यक्षांचा पुढाकार....एमसीए सदस्य राहुल शेवाळेंकडून प्रत्यक्ष पाहणी
सावंतवाडी
सावंतवाडी येथील ऐतिहासिक जिमखाना मैदानाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. रणजी करंडकासह राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट सामन्यांचे आयोजन या मैदानावर करता यावे, या उद्देशाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसोबत (एमसीए) टाय-अप करण्याची योजना आखली जात आहे. याच पार्श्वभूमीवर एमसीएचे मुख्य सदस्य राहुल शेवाळे यांनी जिमखाना मैदानाची प्रत्यक्ष पाहणी केली असून, या घडामोडीमुळे सावंतवाडीच्या क्रीडा क्षेत्रात नव्या आशा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक जिमखाना मैदान हे स्थानिक क्रिकेटपटूंसाठी नेहमीच एक महत्त्वाचे क्रीडाकेंद्र राहिलेले आहे. परंतु, या मैदानावर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील सामने खेळवले जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि नगरपरिषदेचे क्रीडा व आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मुख्य सदस्य राहुल शेवाळे यांच्याकडे पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांची जबाबदारी आहे. त्यांच्या या पाहणी दौऱ्यामुळे जिमखाना मैदानाच्या विकासाच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. भविष्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसोबत अधिकृत करार करून या मैदानावर रणजी करंडक, राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील सामने आयोजित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा विकसित करण्याचा मानस आहे; ज्यामुळे सावंतवाडीच्या जिमखाना मैदानाचा कायापालट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या पाहणी दौऱ्यादरम्यान उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी राहुल शेवाळे यांचे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्नेहपूर्वक स्वागत केले. या प्रसंगी नगरपरिषदेचे क्रीडा व आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, ज्येष्ठ क्रिकेटपटू दिनेश कुबडे यांच्यासह शहरातील अनेक दिग्गज खेळाडू व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
konkansamwad 
