फुटबॉल स्पर्धेत नेवल युनायटेड मुंबई संघ विजेता....जॉन संघटना कोल्हापूर उपविजेता
कणकवली
येथील फुटबॉल क्लबच्या वतीने विद्यामंदिर हायस्कूल पटांगणावर राज्यस्तरीय 'कणकवली चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६' फुटबॉल स्पर्धा झाली. यात नेवल युनायटेड, मुंबई संघाने विजेतेपद पटकावले. या संघाने अंतिम सामन्यात जॉन संघटना, कोल्हापूर संघाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-२ अशा फरकाने पराभव केला.गेल्या चार वर्षांपासून कणकवली फुटबॉल क्लबतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा प्रथमच स्पर्धा अधिक भव्य स्वरूपात आणि साखळी पद्धतीने झाली. या स्पर्धेत मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी, गोवा आणि सिंधुदुर्ग येथील एकूण १६ नामांकित संघांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख २६,०२६ रुपये व आकर्षक चषक, तर उपविजेत्या संघाला १६,०२६ रुपये व आकर्षक चषक प्रदान करण्यात आला. याशिवाय उत्कृष्ट स्ट्रायकर, उत्कृष्ट डिफेंडर, उत्कृष्ट गोलकीपर आणि प्लेमेकर ऑफ द टूर्नामेंट अशी वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात आली.स्पर्धेचे उद्घाटन कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलावडे, डॉ. विद्याधर तायशेटे, कृपाळ सर आणि विवेक मुंज यांच्या उपस्थितीत झाले. उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात जॉन संघटना, कोल्हापूर संघाने स्पार्टन एफसी, पडवे संघाचा ४-० अशा एकतर्फी फरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात नेवल युनायटेड, मुंबई आणि वर्षा विश्वास, कोल्हापूर यांच्यात चुरशीची लढत झाली. हा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये जिंकत नेवल युनायटेडने अंतिम फेरीअंतिम सामना प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत रंगला. दोन्ही बलाढ्य संघांमधील सामना अत्यंत अटीतटीचा झाला. नियोजित वेळेत सामना बरोबरीत सुटल्यानंतर विजेता ठरविण्यासाठी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. त्यामध्ये नेवल युनायटेड, मुंबई संघाने ३-२ असा विजय मिळवला. मुंबई संघाचा गोलकीपर करण विक्रम सिंघ याने उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामन्याचा 'मॅन ऑफ द मॅच' किताब पटकावला.
स्पर्धेतील उत्कृष्ट स्ट्रायकर - सर्वेश वाडकर (जॉन संघटना, कोल्हापूर), उत्कृष्ट गोलकीपर - अनिल जानकर (जॉन संघटना, कोल्हापूर), उत्कृष्ट डिफेंडर - प्रांजल (नेवल युनायटेड, मुंबई), प्लेमेकर ऑफ द टूर्नामेंट - मानव दुखंडे (नेवल युनायटेड, मुंबई) यांना गौरविण्यात आले. स्पर्धेचे पंच म्हणून शिवडाव गावचे भूमिपुत्र आणि मुंबई येथे फुटबॉल रेफरी ऑफिशियल म्हणून कार्यरत असलेले सागर शिवडावकर यांनी जबाबदारी सांभाळली.
konkansamwad 
